अहिल्यानगर : डॉक्टरची जमिनीत कोट्यवधींची फसवणूक, माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का
सावेडीतील डॉक्टरांना जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली बनावट कागदपत्रे आणि खोट्या मालकांच्या सह्यांनी १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांना गंडवल्याचे उघड, भाजपच्या माजी नगरसेवकासह चार जणांच्या टोळीवर मोक्का लागला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अहिल्यानगरच्या सावेडी भागातील एका नामांकित डॉक्टरांना जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत अडकवून तब्बल १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बनावट कागदपत्रे, खोटे मालक उभे करून आणि बोगस सह्या करून हा सगळा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी कठोर पाऊल उचलत मुख्य सूत्रधार आणि भाजपच्या माजी नगरसेवकासह चौघांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांनी हा प्रस्ताव नुकताच मंजूर केल्यामुळे भागातील भू-माफियांचे धाबे दणाणले आहेत. मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींमध्ये माजी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. सावेडी, अहिल्यानगर), अमोल बबन जाधव (रा. मोरगव्हाण, ता. नेवासे), महेश नारायण कुहे आणि भारत फुलमाळी (रा. घोडेगाव, ता. नेवासे) यांचा समावेश आहे. झोपडी कॅन्टीन परिसरातील डॉ. अनिल सूर्यभान आठरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
आरोपींनी सुरुवातीला डॉक्टरांचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांना जमिनी दाखवून व्यवहाराचे आमिष दिले. प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी जमिनीचे बनावट मालक उभे करून त्यांच्या खोट्या सह्या आणि बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली. याच कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी वेळोवेळी कोट्यवधी रुपये उकळले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी तपास वेगाने पुढे नेत मुख्य संशयित अमोल जाधव याला अटक केली. त्यानंतर माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे आणि महेश कुन्हे यांना नाशिक कारागृहातून ताब्यात घेऊन याच प्रकरणात अटक करण्यात आली.
आरोपींनी पूर्वनियोजित आणि संघटितपणे हा आर्थिक गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव तयार केला. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यामार्फत पाठवलेला हा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांनी छाननी करून मंजूर केला. सध्या शहर उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
स्वप्निल शिंदे याच्या टोळीवर यापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई झालेली होती. आता जमीन फसवणुकीच्या या कोट्यवधींच्या प्रकरणात पुन्हा मोक्का लागल्याने त्याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. अहिल्यानगरमध्ये एखाद्या टोळीवर अशी दुसऱ्यांदा मोक्का कारवाई होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी, त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
स्वप्निल शिंदे आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वीही मारामारी, दहशत पसरवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारखे गंभीर गुन्हे तोफखाना आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. जुलै २०२३ मध्ये सावेडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड आणि शस्त्रांनी प्राणघातक हल्ला झाला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात स्वप्निल शिंदे याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई केली होती.