आता ATM मधूनच मिळणार नवं Debit Card, बँकेत जायची गरज नाही
मुंबईतील Global Fintech Fest 2026 मध्ये ही नवीन सुविधा लॉन्च होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बँकेत खातं उघडलं की आधी Debit Card साठी जवळपास 8 दिवस वाट बघावी लागायची. कार्ड पोस्टानं घरी यायचं. आता काही बँका एका दिवसात कार्ड देतात, पण त्यासाठी ब्रँचमध्ये जाऊन फॉर्म भरायची कटकट अजूनही आहेच. आता मात्र सरकार अशी सुविधा आणतंय, ज्यामुळे डेबिट कार्ड थेट ATM मशीनमधूनच मिळेल.
मुंबईत 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान Global Fintech Fest 2026 भरतंय. या फेस्टच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे 9 सप्टेंबरच्या संध्याकाळी DFS सेक्रेटरी ही नवीन सुविधा लॉन्च करणार आहेत. यामुळे डेबिट कार्ड देण्याची जुनी पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. आत्तापर्यंत नवीन कार्ड हवं असेल तर बँकेत जायचं, अर्ज करायचा, मग ते कार्ड हेड ऑफिसमध्ये प्रिंट होऊन घरी यायला 7 ते 10 दिवस लागायचे. मध्येच कार्ड हरवलं तर पुन्हा तीच प्रोसेस करावी लागायची. नवीन सिस्टममुळे हे सगळं झंझट बंद होणार आहे.
सरकारचा उद्देश एकच आहे - काम सोपं आणि फास्ट करणं. सध्या बँकेच्या ब्रँचमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे साध्या कार्डसाठीसुद्धा लोकांना रांगेत उभं राहावं लागतं आणि बँक कर्मचाऱ्यांवरही ताण येतो. ATM वाली ही सुविधा सुरू झाली की लोकांचा वेळ वाचेल आणि बँकेचं कामही हलकं होईल. विशेषतः ग्रामीण भागात, जिथे बँक लांब असते, तिथल्या लोकांना याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. जवळच्या ATM मध्ये गेलं की काम होईल.
ही सिस्टम सुरू झाल्यावर बँकेत जाण्याची गरजच उरणार नाही. सकाळी कार्ड हरवलं, तर दुपारीच जवळच्या ATM मधून नवीन कार्ड काढता येईल.
नवी सिस्टम कशी काम करणार, हे बघूया. समजा तुमचं डेबिट कार्ड हरवलं, तुटलं किंवा एक्सपायर झालं, तर फक्त जवळच्या ATM मध्ये जायचं. तिथे स्क्रीनवर 'Instant Debit Card' किंवा 'Get New Card' असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं. मग आधार नंबर किंवा खाते नंबर आणि मोबाईलवर आलेला OTP टाकायचा. ओळख पटली की मशीनमध्येच नवीन डेबिट कार्ड प्रिंट होऊन बाहेर येईल - अगदी ATM मधून पैसे निघतात तसंच. काही बँका यासाठी बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याचा ठसाही घेणार आहेत, जेणेकरून दुसऱ्या कोणाला तुमचं कार्ड काढता येऊ नये.
या एका पावलानं बँकिंग सेवा आणखी आधुनिक होणार आहे. ग्राहकांचा फायदा तर होईलच, पण बँकेच्या ब्रँचवरचा ताणही कमी होईल. छोट्या-छोट्या कामांसाठी लोकांना बँकेत जावं लागणार नाही. ही सुविधा सुरू झाल्यावर कोणत्या बँका सगळ्यात आधी ATM मध्ये ही मशीन बसवतात, हे बघावं लागेल. पण एक नक्की, पुढच्या काही महिन्यांत पोस्टमनची वाट बघण्याचे दिवस संपणार आहेत.