iPhone 18 डुओच्या किंमतीत टाटा, मारुती, रेनोच्या पाच नव्या कोऱ्या कार्स घरी येणार
अॅपलच्या नव्या फोल्डेबल फोनची किंमत साडेचार लाखांच्या घरात, तेवढ्याच पैशात मिळतील या पाच गाड्या
अॅपलने आयफोन 18 सीरीज बाजारात आणली असून त्यातला कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आयफोन 18 डुओ याची सध्या जोरदार चर्चा आहे. या फोनच्या टॉप मॉडेलची भारतातली किंमत साधारण 4.50 लाख रुपये सांगितली जातेय. एका मोबाईलसाठी साडेचार लाख रुपये मोजायचे म्हटलं तर सामान्य माणसाला हा आकडा चक्रावून टाकणारा आहे. पण गंमत म्हणजे याच किंमतीत भारतात टाटा, मारुती आणि रेनो सारख्या मोठ्या कंपन्यांच्या तब्बल पाच नव्या कोऱ्या कार्स सहज घरी आणता येतात. या बजेटमध्ये नेमके कोणते पर्याय मिळतात, ते पाहूया.
यादीतली सगळ्यात स्वस्त गाडी आहे मारुती सुझुकीची एस-प्रॅसो, जी देशातल्या सर्वात परवडणाऱ्या कारपैकी एक मानली जाते. हिच्या STD (O) पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.50 लाख रुपये आहे. LXI (O) व्हेरियंटसाठी 3.82 लाख रुपये मोजावे लागतात, तर VXI (O) व्हेरियंटची किंमत 4.32 लाख रुपये आहे. म्हणजे आयफोन 18 डुओच्या पैशात एस-प्रॅसोचा सगळ्यात वरचा व्हेरियंटसुद्धा घेता येतो.
भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंत असणारी मारुती सुझुकीची ऑल्टो के10 सुद्धा याच बजेटमध्ये बसते. हिच्या STD (O) मॉडेलची किंमत 3.70 लाख रुपये आहे, तर LXI (O) आणि कमर्शियल Tour H1 व्हेरियंटची किंमत 4 लाख रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे 4 लाख रुपये खर्चून ही कार घेतल्यावरही खिशात साधारण 50 हजार रुपये शिल्लक राहतात.
स्टायलिश लूकसाठी ओळखली जाणारी रेनो क्विड ही सुद्धा यादीत आहे. हिच्या Evolution MT व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 4.53 लाख रुपये असून ती जवळपास आयफोनच्या किंमतीएवढीच आहे. थोडं बजेट वाढवलं तर याच कारचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणारा AMT पर्यायही घेता येतो.
हॅचबॅक सेगमेंटमध्ये थोडी मोठी आणि सुरक्षित गाडी हवी असणाऱ्यांसाठी टाटा टियागो हा चांगला पर्याय ठरू शकतो. हिच्या बेस Smart पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 4.77 लाख रुपये आहे. ही किंमत आयफोनच्या बजेटपेक्षा किंचित जास्त असली, तरी थोडी तडजोड केली तर ही मजबूत कार घरी आणता येते.
यादीतली सगळ्यात शेवटची आणि भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी गाडी म्हणजे मारुती सुझुकी वॅगनआर. हिच्या LXI पेट्रोल MT व्हेरियंटची किंमत 4.99 लाख रुपये असून ती आयफोनपेक्षा साधारण 50 हजार रुपयांनी महाग आहे. पण जास्त केबिन स्पेस आणि फॅमिली कारचा अनुभव हवा असणाऱ्यांसाठी थोडे जास्त पैसे देऊन वॅगनआर घेणं फायद्याचं ठरू शकतं.
वर सांगितलेल्या सगळ्या कार्सच्या किंमती या एक्स-शोरूम आहेत, हे लक्षात घ्यावं.