आटपाडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणी सत्तर वर्षांच्या आरोपीला फाशीची शिक्षा
विटा सत्र न्यायालयाने २०१८ मधील आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल दिला असून आरोपीला फाशी तर दोन अत्याचार प्रकरणांत जन्मठेप सुनावली आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात विटा सत्र न्यायालयाने ७० वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी कोंडीबा काळेल (रा. गळवेवाडी, ता. आटपाडी) असे दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या हत्येसोबतच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन स्वतंत्र प्रकरणांतही त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सरकार पक्षाकडून सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी बाजू मांडली.
ही घटना ७ जानेवारी २०१८ रोजी घडली होती. आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी परिसरातून त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा सगळीकडे शोध घेतला, पण तिचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गळवेवाडीतील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अत्याचार झाल्याचे आणि गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर पोलिसांनी हत्या व अत्याचाराच्या अंगाने तपास सुरू केला.
घटनेनंतर सुरुवातीचे जवळपास सहा महिने आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. २६ जुलै २०१८ रोजी दोन वेगळ्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी काळेलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाच्या तपासात पीडित मुली आणि त्यांच्या आईचे कलम १६४ अंतर्गत न्यायालयात जबाब नोंदवले गेले. त्या जबाबांमधून ७ जानेवारीला मृत मुलीसोबत आरोपी असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या धाग्यावरून तपासाला वेग दिला आणि काळेलला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी केले.
तपासादरम्यान आरोपीने मृतदेह लपवण्याचा आणि नंतर तो विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी लोखंडी कणगी, चादर यांसह अन्य वस्तू जप्त केल्या. चादरीवर सापडलेली टिकली पीडित मुलीच्या आजी-आजोबांनी ओळखली. कोल्हापूरच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात लोखंडी कणगीत मानवी रक्ताचे अंश सापडल्याचे स्पष्ट झाले. हे पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तपशील खटल्यात निर्णायक ठरले.
खटल्यात सरकार पक्षाने एकूण १९ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने शिवाजी काळेलला अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात दोषी ठरवले आणि फाशीची शिक्षा सुनावली. सोबतच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा निकाल अनेक वर्षांनंतर लागला असून, विटा सत्र न्यायालयाच्या या निर्णयाकडे आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले होते.