गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:00 IST

आसिफ शेखच्या शतकी खेळीच्या जोरावर नेपाळचा यूएईवर विजय, आशिया कप २०२७चे तिकीट पक्के

क्वालालंपूरमध्ये झालेल्या एसीसी मेन्स प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात नेपाळने यूएईला ४४ धावांनी हरवले आणि २०२७च्या आशिया कपमध्ये स्थान मिळवले.

आसिफ शेखच्या शतकी खेळीच्या जोरावर नेपाळचा यूएईवर विजय, आशिया कप २०२७चे तिकीट पक्के छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नेपाळच्या क्रिकेट संघाने मोठा पराक्रम करत २०२७च्या आशिया कपचे तिकीट पक्के केले आहे. एसीसी मेन्स प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात नेपाळने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईला ४४ धावांनी धूळ चारली आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.

क्वालालंपूरच्या बायमास ओव्हल मैदानावर झालेल्या या फायनलमध्ये नेपाळने नाणेफेक जिंकून आधी बॅटिंग करायचा निर्णय घेतला. आसिफ शेख आणि अर्जुन कुमाल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. कुमाल ६३ चेंडूंत सहा चौकार मारत ४३ धावांवर बाद झाला, पण आसिफ शेख मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता.

कर्णधार रोहित पौडेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी आसिफने ६८ धावांची भर घातली आणि अवघ्या १०६ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याच्या खात्यात ८ चौकार आणि ४ षटकारांसह एकूण १०२ धावा जमा झाल्या. करिअरमधलं हे त्याचं दुसरं वनडे शतक ठरलं. या दमदार खेळीच्या जोरावर नेपाळने ५० षटकांत ९ विकेट गमावत ३१३ धावांचा डोंगर उभा केला. यूएईविरुद्ध नेपाळची ही आत्तापर्यंतची सर्वोच्च वनडे धावसंख्या ठरली. यापूर्वी मे महिन्यात कीर्तिपूर इथे नेपाळने यूएईविरुद्ध २८९ धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये नेपाळची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

३१४ धावांचा पाठलाग करताना यूएईने सुरुवात तर चांगली केली, पण मधल्या षटकांत एकापाठोपाठ एक विकेट गमावल्याने त्यांचा डाव कोलमडला. फलंदाज राहुल चोप्राने शतक झळकावत १०० धावांवर नाबाद राहत एकहाती झुंज दिली. टॅनिस सुरीने ४२ आणि कर्णधार हरप्रीत भाटियाने ३३ धावांचे योगदान दिले, पण संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात हे दोघेही अपयशी ठरले. अखेर यूएईचा डाव ४९.१ षटकांत २६९ धावांवर आटोपला.

नेपाळकडून करण केसीने तीन विकेट घेत गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली, तर ललित राजबोंगशीने दोन विकेट घेतल्या. संदीप लामिछाने, रोहित पौडेल, गुलसन झा, बशीर अहमद आणि दीपेंद्र सिंग ऐरी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

या विजयामुळे नेपाळने २०२७च्या वनडे आशिया कपमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून म्हणजेच एसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मेन्स प्रीमियर कपच्या विजेत्या संघाला थेट आशिया कपमध्ये प्रवेश मिळतो. नेपाळच्या पात्रतेमुळे आता २०२७च्या आशिया कपसाठी सहा संघ निश्चित झाले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश हे संघ आधीच पात्र ठरले होते. २०२७चा आशिया कप १८ जून ते ४ जुलै या कालावधीत बांग्लादेशमध्ये खेळवला जाणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ