Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? बीसीसीआयने दिलं स्पष्ट उत्तर
महिला आशिया कप जिंकूनही टीम इंडियाच्या हातात अजून ट्रॉफी नाही, बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण दिलं
महिला आशिया कप २०२६ च्या फायनलमध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७२ धावांनी मात करत आठव्यांदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं. पण विजेतेपद मिळूनही भारतीय महिला संघाच्या हातात अजून ट्रॉफी आलेली नाही. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पुरुष संघाने जिंकलेली आशिया कपची ट्रॉफीसुद्धा अजून भारताकडे पोहोचलेली नाही. एसीसीचे प्रमुख आणि पाकिस्तानचे कॅबिनेट मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला भारतीय संघाने नकार दिला होता, त्यामुळे या ट्रॉफी कधी परत केल्या जातील, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. या संपूर्ण प्रकरणावर आता बीसीसीआयने खुलासा केला आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, टीम इंडियाला लवकरच पुरुष आणि महिला दोन्ही आशिया कपच्या ट्रॉफी मिळणार आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतंय की ट्रॉफी मिळवण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. सैकिया म्हणाले, आम्हाला आशा आहे की लवकरच फक्त महिला आशिया कपचीच नाही, तर गेल्या वर्षभरापासून आमच्याकडे नसलेली पुरुष आशिया कपची ट्रॉफीसुद्धा मिळेल. दोन्ही ट्रॉफी लवकरच आमच्या हाती येतील, असंही ते म्हणाले.
सैकिया यांनी हेही सांगितलं की, बीसीसीआयने एक प्रस्ताव दिला होता, ज्यात आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष खालिद अल जरुनी यांनी विजेत्या संघाला ट्रॉफी द्यावी अशी सूचना होती. सैकिया म्हणाले, आमची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट होती, जो आपल्या देशाच्या हितासाठी काम करत नाही अशा व्यक्तीकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नव्हतो. त्यामुळे आम्ही सुचवलं होतं की एसीसीचे उपाध्यक्ष आणि अमिरात क्रिकेट बोर्डाचे अधिकारी खालिद अल जरुनी यांनी ट्रॉफी द्यावी. पण आमची ही सूचना मान्य झाली नाही, म्हणून ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.
पुरुषांच्या आशिया कपमध्ये टीम इंडिया जिंकल्यानंतर मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी स्वतःसोबत नेली होती, त्यामुळे त्यांना ट्रॉफी चोर असं टोपणनाव पडलं. महिला आशिया कप २०२६ मध्येसुद्धा बीसीसीआयने आधीच कल्पना दिलेली असतानाही मोहसिन नक्वी यांनी स्वतःच ट्रॉफी द्यायचा आग्रह धरला. भारतीय महिला संघ ट्रॉफी घ्यायलाच गेला नाही, त्यामुळे नक्वी यांना जवळपास ४५ मिनिटं थांबावं लागलं आणि शेवटी लाजेखातर त्यांना स्टेडियम सोडून जावं लागलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, ज्यात भारतीय चाहते मोहसिन नक्वी यांना ट्रॉफी चोर म्हणून चिडवताना दिसतायत.