स्मृती मंधाना ६९ धावांवर, टी-२० विक्रमाला गवसणी घालण्याची संधी
बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मंधानाने ६९ धावा केल्या तर ती महिला टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर करेल.
महिला आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारताची सलामीवीर स्मृती मंधाना इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिने अवघ्या ६९ धावा केल्या तरी ती महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर करू शकते.
सध्या हा विक्रम न्यूझीलंडच्या अनुभवी फलंदाज सुझी बेट्सच्या नावावर आहे. बेट्सने १८६ सामन्यांत ४,७५८ धावा केल्या आहेत. मंधाना या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून तिने १७४ सामन्यांत ३०.६५ च्या सरासरीने ४,६९० धावा जमवल्या आहेत. यात दोन शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. तिच्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ६३४ चौकार आणि ९५ षटकार निघाले आहेत. म्हणजे बेट्सचा विक्रम मोडायला तिला फक्त ६९ धावांची गरज आहे. या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ४,२४९ धावांसह तिसऱ्या, श्रीलंकेची चमारी अथापट्टू ४,०९५ धावांसह चौथ्या आणि न्यूझीलंडचीच सोफी डिव्हाईन ३,८१७ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
आशिया कप २०२६ मध्येही मंधानाचा फॉर्म भलताच जबरदस्त आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा तिच्याच नावावर असून तीन सामन्यांत तिने १५२ धावा ठोकल्या आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात तर तिने अवघ्या ६४ चेंडूंत १२४ धावांची तुफानी खेळी केली होती, ज्यात १४ चौकार आणि ७ षटकार होते. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्डही एकदम भक्कम आहे. दोन्ही संघांत आतापर्यंत झालेल्या २४ टी-२० सामन्यांपैकी भारताने तब्बल २१ सामने जिंकले असून बांगलादेशच्या वाट्याला फक्त ३ विजय आले आहेत. सप्टेंबर २०२३ पासून तर भारताने बांगलादेशविरुद्ध सलग आठ टी-२० सामने जिंकले आहेत.
भारतीय संघ या स्पर्धेत विक्रमी आठव्या आशिया कप जेतेपदाच्या इराद्याने उतरणार आहे. मात्र चाहत्यांचे लक्ष केवळ टीम इंडियाच्या विजयावरच नसेल, तर मंधानाच्या या ऐतिहासिक विक्रमाकडेही असेल. हा विक्रम झाला तर ती महिला टी-२० क्रिकेटच्या सर्वकालीन धावांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचेल.
भारताचा संभाव्य संघ - स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), भारती फुलमाली, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी.
बांगलादेशचा संभाव्य संघ - दिलारा अख्तर, फरजाना इस्मीन, निगार सुलताना (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शर्मीन अख्तर सुप्ता, रितू मोनी, शोर्ना अख्तर, फहिमा खातून, राबिया खान, मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर, सुलताना खातून.