आई तुळजाभवानी: चातुर्मासाची पोथी अचानक गायब, अन् महालात झाली बालगणेशांची एन्ट्री; पुढे काय घडणार?
कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बालगणेशांचं आगमन होणार असून, त्यांच्यामुळे तुळजापुरातील महालाचं वातावरण भक्तिमय होणार आहे.
गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला असून सगळीकडे भक्तीचं आणि आनंदाचं वातावरण पसरलं आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर कलर्स मराठीवरील गाजलेली मालिका 'आई तुळजाभवानी' आपल्या प्रेक्षकांसाठी एक वेगळाच भक्तिमय ट्विस्ट घेऊन येते आहे. गणेश चतुर्थीचं औचित्य साधत मालिकेत आता प्रत्यक्ष बालगणेशांची एन्ट्री होणार असून, त्यांच्या गोड आणि खट्याळ रूपामुळे तुळजापुरातील महालाचं वातावरण पूर्णपणे बदलून जाणार आहे.
सध्या मालिकेतील कथानकात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. देवीच्या महालातून चातुर्मासाची अत्यंत महत्त्वाची आणि दिव्य मानली जाणारी पोथी अचानक गायब होते, त्याचबरोबर स्वयंपाकघरातील नैवेद्यही नाहीसा होतो. या घटनेमुळे देवीसह महालातील सर्वांनाच काळजी लागून राहते आणि नेमकं काय घडलं याचा शोध सुरू होतो. महालातील प्रत्येक कोपरा शोधूनही पोथीचा आणि नैवेद्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही, त्यामुळे संभ्रमाचं वातावरण अधिकच गडद होतं.
याच गोंधळाच्या दरम्यान महालात एक लहानसं, खट्याळ बालरूप प्रवेश करतं. इवल्याशा पावलांनी वाड्यात हिंडणारं आणि खोडकर हसणारं हे मूल दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द बालगणेश असतात. विशेष गोष्ट म्हणजे हरवलेली चातुर्मासाची पोथी त्यांच्याच हातात असते. अत्यंत गोड शब्दांत बालगणेश महालात येऊन सांगतात, "पुढचे अकरा दिवस या पोथीची जबाबदारी माझी!" त्यांच्या या वाक्यामुळे महालातील सर्वांच्या मनातील शंका दूर होते आणि आनंदाचं वातावरण तयार होतं.
गणेश चतुर्थीच्या याच काळात बालगणेशांचं आगमन होत असल्यामुळे महालात त्यांचं वाजत-गाजत आणि मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जातं. त्यांचं हे गोंडस रूप पाहून पार्वतीच्या रूपात असलेली तुळजाभवानीही मनोमन सुखावते. सध्या असुरांनी मिळवलेलं ब्रह्मास्त्र निष्प्रभ करण्यासाठी तुळजाभवानीने स्वतः बालरूप धारण केलेलं आहे, त्यामुळे बालगणेश आणि देवीचं बालरूप एकत्र येणं हा मालिकेतील पुढच्या भागांसाठी एक रंजक वळणबिंदू ठरणार आहे. दोन बालरूपं एकाच महालात असल्यामुळे पुढच्या कथानकात अनेक नवे प्रसंग घडण्याची शक्यता आहे.
पुढील अकरा दिवस बालगणेशांच्या वास्तव्यामुळे महालातलं वातावरण पूर्णपणे बदलून जाणार आहे. त्यांच्या खट्याळ लीला, गोड बोलणं आणि खेळकर स्वभावामुळे कथेला वेगळाच रंग चढणार आहे. देवीच्या बालरूपामुळे आधीच जमलेली बालगोपाळांची टोळीदेखील आता बालगणेशांच्या या धमाल-मस्तीत सामील होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये भक्ती, उत्साह आणि निरागस खट्याळपणा यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चातुर्मासाच्या कथांमधून भक्तीचे नवे नवे पैलूही या निमित्ताने उलगडणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा भाग खास पर्वणी ठरणार आहे. बालगणेशांचं गोड रूप, त्यांच्या खट्याळ लीला आणि त्यानंतर घडणाऱ्या रंजक घडामोडी हा मालिकेच्या पुढील भागांचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.