आठवा वेतन आयोग: फिटमेंट फॅक्टर 2.57 धरल्यास शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत पगारवाढीचा अंदाज
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे लागले असून, 2.57 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरून संभाव्य पगारवाढीचे गणित मांडण्यात आले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय ते 8व्या केंद्रीय वेतन आयोगाकडे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर बेसिक पगारात नेमकी किती वाढ होणार, याची उत्सुकता लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आहे. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती फिटमेंट फॅक्टरची, कारण हाच आकडा ठरला की नवीन पगाराचं संपूर्ण गणित त्यावर अवलंबून राहणार आहे. सध्यातरी 2.57 हा फिटमेंट फॅक्टर गृहीत धरून काही उदाहरणांमधून संभाव्य पगारवाढ समजून घेता येते.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय, हे आधी समजून घेऊ. नवीन वेतन आयोग लागू करताना कर्मचाऱ्यांच्या जुन्या बेसिक पगाराच्या आधारे नवीन बेसिक पगार ठरवण्यासाठी हा फॅक्टर वापरला जातो. सोप्या शब्दांत सांगायचं तर सध्याच्या बेसिक पगाराला एका ठराविक आकड्याने गुणलं जातं आणि त्यातून नवीन बेसिक पगार निश्चित होतो. 8व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय आणि तसं झालं तर पगारात मोठी वाढ होईल, असं म्हटलं जातंय. मात्र हा 2.57 चा आकडा सध्या फक्त गृहीत धरलेला आहे, अंतिम फिटमेंट फॅक्टर अजून अधिकृतपणे ठरलेला नाही.
लेव्हल-1 मधल्या शिपाई किंवा एमटीएस कर्मचाऱ्यांचं सध्याचं बेसिक वेतन 18,000 रुपये आहे. 2.57 फिटमेंट फॅक्टर धरला तर 18,000 गुणिले 2.57 म्हणजे 46,260 रुपये होतात. म्हणजे सध्याच्या 18,000 रुपयांच्या तुलनेत बेसिक पगारात 28,260 रुपयांची वाढ दिसू शकते.
शिक्षकांच्या पगारातही अशीच मोठी उडी दिसू शकते. लेव्हल-6 मधल्या शिक्षकांचं सध्याचं बेसिक वेतन 35,400 रुपये आहे. हे 2.57 ने गुणलं की 90,978 रुपये होतात, म्हणजे शिक्षकांचं संभाव्य नवीन बेसिक वेतन जवळपास 91 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतं.
अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लेव्हल-10 मधल्या अधिकाऱ्यांचं सध्याचं बेसिक वेतन 56,100 रुपये आहे. यावर 2.57 फिटमेंट फॅक्टर लावला तर 56,100 गुणिले 2.57 म्हणजे 1,44,177 रुपये होतात. म्हणजेच या गृहीतकानुसार लेव्हल-10 अधिकाऱ्यांचं नवीन बेसिक वेतन जवळपास सव्वालाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.
पण हातात प्रत्यक्ष येणारा पगार फक्त बेसिक वेतनावर ठरत नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) यांसारखे विविध भत्तेही एकूण पगारात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नवीन बेसिक वेतन ठरल्यानंतर प्रत्यक्ष हातात येणारी रक्कम वरील उदाहरणांपेक्षा वेगळी असू शकते. शिवाय आठवा वेतन आयोग लागू करताना DA, HRA, TA आणि इतर भत्त्यांच्या नियमांतही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त फिटमेंट फॅक्टरच्या आधारे अंतिम पगार किती असेल, हे आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही.
याचा फायदा फक्त सध्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच नाही, तर पेन्शनधारकांनाही मिळू शकतो. उदाहरणादाखल, किमान 9,000 रुपये पेन्शनवर 2.57 फिटमेंट फॅक्टर धरला तर 9,000 गुणिले 2.57 म्हणजे 23,130 रुपये होतात. म्हणजे या गृहीतकानुसार 9,000 रुपयांची पेन्शन 23,130 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र ही सगळी आकडेवारी संभाव्य गणितावर आधारित आहे. नवीन वेतनश्रेणी, वेतनवाढ, भत्ते, DA आणि पेन्शनमध्ये नेमके कोणते बदल होणार, याबाबत अधिकृत निर्णय झाल्यावरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या 2.57 फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सांगितलेली ही वेतनवाढ अंदाजित आहे, अंतिम वाढ म्हणून समजू नये.