418 किमी रेंज, दमदार लूक, चायनीज इलेक्ट्रिक SUV Creta EV आणि Harrier EV ला टक्कर द्यायला भारतात येणार
Chery कंपनीची iCAUR 03 ही इलेक्ट्रिक SUV भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली असून JSW Motors अंतर्गत लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतातल्या इलेक्ट्रिक कारच्या मार्केटमध्ये सध्या नव्या कंपन्यांची आणि नव्या मॉडेल्सची चांगलीच गर्दी वाढतेय. या यादीत आता चीनची कार कंपनी Chery हिचंही नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. कंपनीची 5-सीटर इलेक्ट्रिक SUV iCAUR 03 अलीकडेच भारतात रस्त्यावर दिसली. सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे टेस्टिंगच्या गाड्यांना जसं झाकून ठेवलं जातं, तसं या गाडीला कुठल्याही कव्हरशिवाय एका ट्रकवरून नेलं जात होतं.
यामुळे iCAUR 03 लवकरच भारतीय बाजारात येऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही SUV JSW Motors या ब्रँडखाली भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भारतात दाखल झाल्यास ही गाडी Hyundai Creta Electric आणि Tata Harrier EV सारख्या इलेक्ट्रिक SUV ला थेट टक्कर देऊ शकते.
डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर iCAUR 03 चा लूक बॉक्सी आणि मस्क्युलर आहे. भारतात दिसलेल्या गाडीत ब्लॅक फ्रंट बंपर, फ्लश डोअर हँडल्स, ड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि LED हेडलाइट्स आहेत. या SUV ची लांबी 4,406 mm, रुंदी 1,910 mm आणि उंची 1,715 mm आहे, तर व्हीलबेस 2,715 mm एवढा आहे. गाडीचं ग्राउंड क्लीयरन्स 195 mm असल्यामुळे खराब आणि खडबडीत रस्त्यांवरही ती चांगली चालू शकते.
महत्त्वाचं म्हणजे Chery कंपनीने iCAUR 03 चं पेटंटही भारतात आधीच दाखल केलंय. पेटंट फाईलमध्ये दाखवलेल्या मॉडेलमध्ये रस्त्यावर दिसलेल्या गाडीपेक्षा जास्त रफ आणि टफ बंपर तसेच बॉडी क्लॅडिंग दिसतं.
पॉवरट्रेनबद्दल सांगायचं तर चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या iCAUR 03 मध्ये 69.8 kWh ची LFP बॅटरी बसवलेली आहे. यात ड्युअल मोटर सेटअप आणि ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) दिलं गेलंय. हे कॉम्बिनेशन 279 hp पॉवर आणि 385 Nm टॉर्क तयार करतं. रेंजच्या बाबतीतही ही गाडी दमदार आहे. NEDC सायकलनुसार एका फुल चार्जमध्ये iCAUR 03 तब्बल 418 किमीपर्यंत धावू शकते. शिवाय बॅटरीला 80kW च्या DC फास्ट चार्जिंगचीही सोय आहे.
केबिनच्या बाबतीतही ही SUV मॉडर्न आणि प्रीमियम वाटते. आत 15.6 इंचाचा मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि 9.2 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले दिलाय. फीचर्समध्ये पॉवर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट तसेच रिअर सीट्स, Level 2 ADAS आणि सुरक्षेसाठी 360 डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे.
Chery कडून iCAUR 03 सोबतच इतर काही मॉडेल्सचंही भारतात टेस्टिंग सुरू असल्याचं सांगितलं जातंय. यात Jetour T2, Jaecoo J5 आणि iCar V23 या गाड्यांचा समावेश आहे. यापैकी Jetour T2 सर्वात आधी भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. iCAUR 03 भारतात आली, तर मिड साइज इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये तिची Hyundai Creta Electric आणि Tata Harrier EV सोबत थेट स्पर्धा होऊ शकते. मात्र भारतातल्या लाँचची अधिकृत तारीख, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीकडून अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.