प्रीमियम इलेक्ट्रिक बाईक घ्यायचीय, तेही 2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये? ओला ते रॉयल एनफिल्डपर्यंतच्या या बाईक्सची
भारतातलं इलेक्ट्रिक मोटरसायकलचं मार्केट झपाट्याने वाढतंय आणि त्यामुळे आता ग्राहकांसमोरचे पर्यायही वाढलेत. आधी चांगली रेंज, दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम फीचर्स असलेली इलेक्ट्रिक बाईक घ्यायची म्हटलं की मोठं बजेट लागायचं, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. 2 ते 3 लाख रुपयांच्या आसपासच्या किमतीतही काही आकर्षक बाईक्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यात अल्ट्रावॉयलेट, रॅप्टी.एचव्ही, रॉयल एनफिल्ड आणि ओला या कंपन्यांच्या बाईक्सचा समावेश होतो. या सगळ्या बाईक्समध्ये रेंज, स्पीड आणि फीचर्सच्या बाबतीत वेगवेगळे पर्याय मिळतात, त्यामुळे ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार निवड करता येते.
यातली पहिली बाईक म्हणजे अल्ट्रावॉयलेटची X-47 क्रॉसओव्हर. ही बाईक रोजच्या वापरासोबतच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही बनवलेली आहे. यात इंटिग्रेटेड डॅशकॅम, वेगवेगळे राइडिंग मोड्स आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्स दिलेत. या बाईकची IDC रेंज 323 किलोमीटरपर्यंत जाते आणि टॉप स्पीड 145 किमी प्रतितास इतका आहे. एक्स-शोरूम किंमत 2 लाख 59 हजार रुपयांपासून सुरू होते. रोज ऑफिस-कामाला जाणाऱ्यांसाठी आणि अधूनमधून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही बाईक उपयोगी ठरू शकते.
दुसरा पर्याय आहे रॅप्टी.एचव्हीची T30. या बाईकमध्ये हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक आर्किटेक्चर वापरलंय, त्यामुळे इलेक्ट्रिक कारसाठी असणाऱ्या पब्लिक DC फास्ट चार्जरवरही ही बाईक चार्ज करता येते, म्हणजे चार्जिंगसाठी वेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडत नाही. कंपनीच्या सांगण्यानुसार तिची IDC रेंज 200 किलोमीटर आणि टॉप स्पीड 135 किमी प्रतितास इतकी आहे. सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2 लाख 39 हजार रुपये आहे.
रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्रिक मोटरसायकल Flying Flea C6 ही आपल्या निओ-रेट्रो लूकमुळे इतर बाईक्सपेक्षा वेगळी उठून दिसते. हलक्या अॅल्युमिनियम फ्रेमवर बनवलेल्या या बाईकमध्ये 154 किलोमीटर रेंज आणि 115 किमी प्रतितास टॉप स्पीड मिळतो. BaaS म्हणजे बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस या पर्यायासह हिची किंमत 1.99 लाख रुपयांपासून सुरू होते. सेफ्टीसाठी ड्युअल-चॅनल ABS हे फीचरही यात दिलंय, जे ब्रेकिंगच्या वेळी अधिक स्थिरता देतं.
ओलाची Roadster Pro ही बाईक 10 इंचाची TFT टचस्क्रीन, ADAS, वेगवेगळे राइडिंग मोड्स आणि व्हॉइस कंट्रोल यांसारखी फीचर्स देते. या बाईकच्या टॉप व्हेरिएंटची IDC रेंज 579 किलोमीटरपर्यंत असून किंमत 1,99,999 ते 2,49,999 रुपयांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे अल्ट्रावॉयलेटची F77 Mach 2 ही बाईक 323 किलोमीटर रेंज आणि 155 किमी प्रतितास टॉप स्पीड देते. हिची किंमत 3.09 लाख ते 4.24 लाख रुपयांपर्यंत आहे. स्पोर्टी लूक आणि जास्त स्पीड आवडणाऱ्यांसाठी हा पर्याय चांगला ठरू शकतो, तर लांब रेंज आणि स्मार्ट फीचर्स हव्या असणाऱ्यांसाठी Roadster Pro चा पर्याय उपयोगी पडेल.