पाण्याचा प्रवाहही झुकला! अवघ्या १३व्या वर्षी ८१ किलोमीटरचा जलप्रवास; विदी भोरने ११ तासांत रचला इतिहास
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द-भोरवाडी इथल्या विदी भोर या तेरा वर्षांच्या मुलीने पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथे ८१ किलोमीटर नदी जलतरण स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द-भोरवाडी इथली विदी नंदकुमार भोर या मुलीने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी क्रीडा क्षेत्रात एक नवा विक्रम नोंदवला आहे. पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथे रविवारी, ६ तारखेला झालेल्या एका खडतर जलतरण स्पर्धेत तिने तब्बल ८१ किलोमीटरचं अंतर पोहून पूर्ण केलं. अहिरण घाट ते गोरा बाजार हा प्रवास तिने अवघ्या ११ तास ५९ मिनिटांत केला आणि या स्पर्धेत मुलींच्या गटात ती दुसऱ्या क्रमांकावर आली.
मूळची अवसरी खुर्दची असलेली विदी सध्या नवी मुंबईतल्या वाशीमध्ये फ्र. अॅग्नेल हायस्कूलमध्ये आठवीत शिकते. एवढं मोठं अंतर ठरलेल्या वेळेत पूर्ण करणारी ती आतापर्यंतची सर्वात लहान वयाची जलतरणपटू ठरली आहे. गेल्या तीन वर्षांत कोणत्याही महिला जलतरणपटूला हे अंतर वेळेत पूर्ण करता आलं नव्हतं, तो विक्रम विदीने मोडला.
विदीच्या नावावर याआधीही काही लक्षवेधी कामगिरी नोंद आहे. काही काळापूर्वी तिने २० किलोमीटरचं जलतरण ४ तास ३ मिनिटांत पूर्ण केलं होतं, तर त्याहून मोठं म्हणजे ४२ किलोमीटरचं अंतर तिने ७ तास ३२ मिनिटांत पार केलं होतं. याशिवाय कोचीमध्ये झालेल्या ६ किलोमीटरच्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. या सगळ्या कामगिरीतून तिची जलतरणातली प्रगती किती वेगाने होते आहे, हे स्पष्ट दिसतं.
एवढी मोठी कामगिरी अचानक घडलेली नाही. सध्या विदी डोंबिवलीतल्या पलावा इथल्या जलतरण केंद्रात रोज ३ ते ४ तास कठोर सराव करते. या सरावादरम्यान तिला नामांकित जलतरणपटू आणि प्रशिक्षक रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांचं मार्गदर्शन मिळतंय. या रोजच्या मेहनतीतूनच तिने हे मोठं अंतर वेळेत पार करण्याची तयारी केली. पुढे जाऊन प्रसिद्ध इंग्लिश चॅनेल पोहून पार करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवण्याचं स्वप्न ती पाहते.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी विदीच्या या कामगिरीचं कौतुक केलं. ते म्हणाले, "अवघ्या तेराव्या वर्षी विदी भोरने ८१ किलोमीटर नदी जलतरण यशस्वीरीत्या पूर्ण करून महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे. तिची जिद्द, अपार मेहनत आणि आत्मविश्वास संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असून, भविष्यात ती जागतिक पातळीवर देशाचं नाव निश्चितच मोठं करेल."
विदी भोर स्वतः याबद्दल म्हणाली, "८१ किलोमीटरचा हा प्रदीर्घ प्रवास माझ्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता; पण सातत्यपूर्ण सराव, पालकांचं पाठबळ आणि प्रशिक्षकांचं अचूक मार्गदर्शन यामुळेच मी हे अंतर पार करू शकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत इंग्लिश चॅनेल पार करणं हे माझं पुढचं अंतिम उद्दिष्ट आहे."