कधी बॉलर्सचं घामटं काढणारा वीरेंद्र सेहवाग का झालाय यमराज? Photo Viral
वीरेंद्र सेहवागचे यमराजाच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, आणि यामागचं कारण एका रिॲलिटी शोशी जोडलेलं आहे.
जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक सलामीवीरांची यादी केली, तर वीरेंद्र सेहवागचं नाव पहिल्या तीनमध्ये हमखास येतं. फॉरमॅट कोणताही असो, तो मॅचच्या पहिल्या बॉलपासूनच फटकेबाजी सुरू करायचा आणि मोठमोठे बॉलर्सही त्याच्या स्ट्राईकला घाबरायचे. मैदानावरची ही आक्रमकता सोडली, तर सेहवागचा विनोदी स्वभाव हेदेखील त्याचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे, आणि आजही त्याने ते जपलं आहे. सध्या त्याचे यमराजाच्या वेशातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो नेमके कशासाठी आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
हे फोटो नीट बघितले, तर लक्षात येतं की गोष्ट फक्त यमराजापुरती नाही. या फोटोंमध्ये सेहवाग न्यूटनच्या वेशात झाडाखाली बसून पुस्तक वाचताना आणि सफरचंद खाली पडण्याची वाट बघतानाही दिसतो. याशिवाय आयसीयूमध्ये एका पेशंटशी बोलताना तो डॉक्टरच्या लूकमध्ये दिसला. यातली सगळ्यात गंमतीशीर गोष्ट म्हणजे शाळेतल्या शिक्षकाच्या वेशात तो मुलांकडून सिट-अप्स करून घेताना दिसला. वेगवेगळ्या भूमिकांमधले हे फोटो बघून सुरुवातीला चाहत्यांना नेमकं प्रकरण काय आहे, हे कळत नव्हतं. या सगळ्या फोटोंमागचं कारण नंतर समोर आलं, ते म्हणजे वीरेंद्र सेहवाग आता 'राईज अँड फॉल' या शोच्या दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.
अमेझॉन एमएक्स प्लेयरवरच्या या शोच्या दुसऱ्या पर्वाची जबाबदारी सेहवागकडे देण्यात आली आहे. शोच्या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन अशनीर ग्रोव्हरने केलं होतं. सूत्रसंचालकाबरोबरच या पर्वातल्या स्पर्धकांची यादीही जाहीर झाली आहे. स्वरा भास्कर, करण पटेल आणि प्रियांका चहर चौधरी यांसारखी मोठी नावं या नव्या पर्वात सामील झाली आहेत. नुकतंच भाजप सोडलेले शहजाद पूनावाला हेदेखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणार असल्याची चर्चा आहे.
सेहवागने हे फोटो स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले असून त्याच्या मित्रांनी आणि क्रिकेटमधल्या अनेक दिग्गजांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. सेहवाग हा मुळातच मजेशीर स्वभावाचा आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे तो या रिॲलिटी शोमध्ये आपला हा मजेशीरपणा कसा दाखवणार आणि प्रेक्षकांना त्याचा हा प्रयत्न आवडणार की नाही, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लवकरच रोहित शर्मादेखील एका शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानावर नाव कमावलेले हे दिग्गज आता प्रेक्षकांचं मनोरंजन करतानाही दिसू लागले आहेत.