दिल्ली हायकोर्टाचा विनेश फोगटला मोठा धक्का, वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप ट्रायलमध्ये उतरता येणार नाही
वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी मागणारी विनेश फोगटची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. नवीन पात्रता निकष सगळ्या खेळाडूंना सारखेच लागू होतात, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
कुस्तीपटू विनेश फोगटला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. १४ सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये तिला आता सहभागी होता येणार नाही. या चाचण्यांमध्ये उतरण्याची परवानगी मिळावी म्हणून विनेशने कोर्टात याचिका केली होती आणि तिला अंतरिम दिलासा द्यावा अशी मागणी केली होती, पण गुरुवारी रात्री न्यायमूर्ती स्वर्ण कांत शर्मा यांनी ही याचिका फेटाळून लावली.
आपल्या आदेशात कोर्टाने स्पष्ट केले की, ७ सप्टेंबर २०२६ रोजी जारी झालेल्या परिपत्रकातले निकष सगळ्या खेळाडूंना सारखेच लागू होतात, कोणालाही त्यातून वेगळी वागणूक दिली जाणार नाही. एखादा खेळाडू ठरलेल्या स्पर्धेत खेळला नसेल, तर तो भारतीय कुस्ती महासंघाने ठरवलेल्या पात्रता श्रेणीत बसत नाही, असं कोर्टाने नमूद केलं. यामुळे आंतरराष्ट्रीय कुस्तीत पुनरागमन करण्याच्या विनेशच्या प्रयत्नांना जोरदार धक्का बसला आहे.
विनेशने या नवीन निवड नियमांना आव्हान दिलं होतं. ७ सप्टेंबरला जारी झालेल्या परिपत्रकानुसार, ठरलेल्या स्पर्धांमध्ये पदक जिंकलेले खेळाडू, राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी झालेले खेळाडू आणि २०२६ च्या U20 विश्वचॅम्पियनशिपसाठी निवड झालेले खेळाडू या चाचण्यांसाठी पात्र ठरतात. या निकषांमुळे आपल्याला ट्रायलमध्ये उतरता येत नसल्याने विनेश कोर्टात गेली होती आणि आपल्याला संधी द्यावी अशी मागणी तिने केली होती. गर्भधारणा, बाळंतपण आणि त्यानंतरच्या तब्येतीत सुधारणा होत असल्यामुळे आपण या काळात काही स्पर्धांना गैरहजर राहिलो, असा युक्तिवाद तिने कोर्टासमोर केला होता. तसंच WFI ने आपल्याला अपात्र ठरवणारी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर गोंडा इथल्या सिनियर ओपन रँकिंग स्पर्धेत उतरण्यापासूनही आपल्याला रोखण्यात आलं होतं, असंही तिने सांगितलं होतं.
दिल्ली हायकोर्टाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची निवड निष्पक्ष, एकसमान आणि कामगिरीवर आधारित प्रक्रियेतून व्हावी, हे देशासाठी खूप महत्त्वाचं आहे. निवड प्रक्रियेत कोणालाही झुकतं माप दिलं जाऊ नये, यावर कोर्टाने भर दिला.
यापूर्वी मे महिन्यात हायकोर्टाच्या एका खंडपीठाने फोगटला आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये उतरण्याची परवानगी दिली होती, याचीही कोर्टाने आठवण करून दिली. त्या चाचण्यांदरम्यान झालेल्या कथित गैरवर्तनाबाबतची कारणे दाखवा नोटीस अजूनही प्रलंबित आहे. न्यायमूर्ती शर्मा यांनी म्हटलं की, WFI चे नवे पात्रता निकष सगळ्या खेळाडूंना सारखेच लागू होतात आणि ते खास विनेशला लक्ष्य करून बनवलेले नाहीत, तर सगळ्या कुस्तीपटूंसाठी एकाच पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत. आता या निर्णयानंतर विनेश फोगट पुढे काय पावलं उचलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.