विमल जाहिरातीवरून शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना एफडीएची नोटीस, मुंढेंचा इशारा
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विमल इलायचीची जाहिरात करणाऱ्या तिन्ही बॉलिवुड कलाकारांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांत ठिकठिकाणी धाडी टाकून चर्चेत आलेले अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता थेट बॉलिवुडमधील मोठ्या नावांना लक्ष्य केले आहे. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विमल इलायचीची जाहिरात या तिघांनी मिळून केली होती, त्या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी झाल्यापासून त्यांनी अनेक कारवाया केल्या आहेत. दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले, तसेच अनेक हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली. या मालिकेत मंत्रालयाच्या कॅन्टीनवरही कारवाई झाली होती. याच पार्श्वभूमीवर आता विमल इलायची जाहिरातीचे प्रकरण समोर आले आहे.
तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट भाष्य केले. ते म्हणाले की, तुमच्यासाठी हे कलाकार सुपरस्टार असतील, पण माझ्यासाठी ते फक्त जाहिरातदार आहेत आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. ते कायद्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी सांगितले.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने बजावलेल्या या नोटीसला अद्याप तिन्ही अभिनेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या तिघांनी यावर अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, विमल आणि इलायचीच्या नावाखाली प्रत्यक्षात पान मसाला छुप्या पद्धतीने विकला जात असून त्याचीच जाहिरात केली जात आहे. या तिन्ही अभिनेत्यांना खुलासा करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पान मावा, गुटखा, तंबाखू यांच्यावर पूर्णपणे बंदी असून ही बंदी सन 2012 मध्ये लागू करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाने असा युक्तिवाद मांडला आहे की, उत्पादन वेगळे असले तरी त्याची ब्रँडिंग पान मसाला ब्रँडशी अप्रत्यक्षपणे संबंध जोडू शकते. याच मुद्द्यावरून एफडीएने 11 ऑगस्ट रोजी या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावली होती. आता यापुढे एफडीए काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्न सुरक्षा कायदा जाहिरातदाराची आणि जाहिरात करणाऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी स्पष्टपणे अधोरेखित करतो, असे मुंढे यांनी सांगितले. ज्या गोष्टीची जाहिरात केली जाते, त्याबाबत योग्य ती खबरदारी घेणे ही संबंधित व्यक्तीची जबाबदारी असते, त्यामुळे आपली कोणतीही जबाबदारी नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. आपण केवळ नैतिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर कायदेशीर दृष्टिकोनातूनही हे बोलत असल्याचेही मुंढे यांनी नमूद केले.