वाशिममध्ये पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ७ फरार आरोपी जेरबंद, शस्त्रे जप्त
वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात राबवलेल्या कोम्बिंग गस्तीत ३२ ठिकाणी छापे टाकून ७ फरार आरोपींना पकडले, तसेच गावठी कट्टा, तलवारी आणि दारू जप्त केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वाशिम जिल्ह्यात बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना हवे असलेले आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. पुढे येणारे सणउत्सव शांततेत पार पडावेत यासाठी गुन्हे दाखल असलेल्या विघ्नसंतोषी लोकांना, तसेच न्यायालयातून जामीन झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपींना शोधून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असल्याचे वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी हेरले. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम आणि वाशिम डिव्हिजनच्या सर्व ठाणेदारांना कोम्बिंग गस्त राबवण्याचे आदेश देण्यात आले.
गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्री हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यासाठीची रुपरेषा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक लता फड यांनी तयार केली. या ऑपरेशनचे नेतृत्व उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम रामकृष्ण पवार यांनी केले. यासाठी ४ पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा वाशिम इथले अधिकारी व अंमलदार मिळून एकूण १६ पथके तयार करण्यात आली आणि एकाचवेळी ३२ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत शिरपूर पोलिस स्टेशनमधील फरार आरोपी लक्ष्मण मधुकर चव्हाण (रा. पांगरखेडा, ता. मालेगाव) याच्या झडतीत १ गावठी कट्टा, ५ जिवंत काडतुसे, २ लोखंडी धारदार तलवारी, ६ फर्शी कुऱ्हाडी, १० लोखंडी सुऱ्या व कोयते, ५०० फूट केबल, केबल कापायचे कटर आणि सायकलच्या चेनच्या अॅक्सलपासून बनवलेले लोखंडी गावठी शस्त्र असा एकूण ४७,५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जुगनूसिंग पवार (रा. पांगरखेडा) याच्या घराच्या झडतीत एक धारदार तलवार आणि १,९२० रुपये किमतीचे २४ नग देशी संत्रा भिंगरी दारूचे कॉर्टर मिळाले.
शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी शंकू गोविंदा पवार (रा. वसारी, ता. मालेगाव, जि. वाशिम) हा त्याच्या राहत्या घरीच सापडला आणि त्याला पोलिस स्टेशन शिरपूरच्या ताब्यात देण्यात आले. चंद्रकांत गोविंदा पवार याच्या घराच्या झडतीत ९ हजार रुपये किमतीची ३० लिटर विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू सापडल्याने ती जप्त करण्यात आली. वसारी गावाजवळील कारवाईदरम्यान रोडवर एमएच ३७ / टी-२५५७ क्रमांकाचा एक ट्रक दिसला. त्याच्या चालकाने स्वतःचे नाव सतिश महेश कुंजाम (२३, रा. लंगपाणी, ता. लखनादोन, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे सांगितले. ट्रकमध्ये भंडाऱ्याकडे नेत असलेला तांदूळ असल्याचे त्याने सांगितले, मात्र त्याबाबत कोणत्याही अधिकृत पावत्या सापडल्या नाहीत. हा तांदूळ रेशनचा असल्याचा संशय आल्याने ट्रक शिरपूर पोलिस स्टेशनला आणण्यात आला.
चांडस इथला गुन्हेगार गंगाराम म्यानू चव्हाण याच्या घराच्या झडतीत एक दुचाकी सापडली. झोडगा आणि बोरगावमधील कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान बोरगावचा संशयित आरोपी अशोक प्रताप चव्हाण (५०, रा. बोरगाव, ता. मालेगाव) याच्या घराच्या झडतीत एक लोखंडी तलवार आणि किराणा सामान मिळाले. या प्रकरणी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये आधीच गुन्हा दाखल असून, अशोक प्रताप चव्हाण याला अटक करण्यात आली. पुढील तपास शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल बव्हाण करत आहेत.
या कारवाईनंतर शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि दारूबंदी कायद्याखाली, तर जऊळका पोलिस स्टेशनमध्ये आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या कोम्बिंग ऑपरेशनसाठी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर आदे, पोलिस निरीक्षक राजेश खेरडे, महिला पोलिस निरीक्षक योगीता भारद्वाज आणि सहायक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी आपापल्या टीमसह सहकार्य केले.