वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला अटक; विद्यार्थिनींसोबत गैरवर्तनाचा आरोप
काटा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तिसरी आणि चौथीतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी शिक्षक दिलीप बोरकर याला अटक केली आहे.
वाशिम तालुक्यातील काटा या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या एका गंभीर प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. या शाळेत तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे. आरोपी शिक्षकाचे नाव दिलीप बोरकर असे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो विद्यार्थिनींसोबत अश्लील वागत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल चौदा विद्यार्थिनींनी बोरकर याच्याकडून गैरवर्तन झाल्याचे सांगितले असून, बुधवारी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हा प्रकार उघडकीस येण्यामागे शाळेतील एका शिक्षिकेची सतर्कता कारणीभूत ठरली. काही विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत आणि रडत तिच्याकडे गेल्या, तेव्हा तिने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलींनी शिक्षकाकडून झालेल्या गैरवर्तनाची सगळी हकीकत सांगितली. हे ऐकताच शिक्षिकेने वेळ न दवडता मुलींच्या पालकांना तसेच शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. बातमी गावात पसरताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी ग्रामस्थांनी त्याला मारहाणही केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी प्राथमिक तपासात आणखी काही विद्यार्थिनींसोबतही असाच प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली आहे. संबंधित सर्व विद्यार्थिनींची ओळख मात्र गोपनीय ठेवण्यात आली आहे. वाशिम ग्रामीण पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवून बोरकर याला अटक केली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बोरकर हा मोबाइलवर विद्यार्थिनींना अश्लील चित्रफिती दाखवत होता. याशिवाय अयोग्य पद्धतीने स्पर्श करून गैरवर्तन केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. एवढेच नाही तर हा प्रकार कोणाला सांगितला तर शाळेत येऊ देणार नाही, अशी धमकीही तो मुलींना देत असे. महिनोनमहिने हा प्रकार सुरू असतानाही शाळेतील त्या शिक्षिकेने वेळीच सतर्कता दाखवली आणि त्यामुळेच हे प्रकरण बाहेर आले, अन्यथा हा गैरप्रकार आणखी काळ लपून राहिला असता.
वाशिमच्या पोलिस ठाणेदार श्रीदेवी पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत ६६ पालकांनी पुढे येऊन आरोपी शिक्षक दिलीप बोरकर याच्याविरोधात कॅमेऱ्यासमोर माहिती दिली आहे. कोणत्याही भीतीशिवाय विद्यार्थिनींनी या प्रकरणाशी संबंधित माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे आरोपीचे आणखी काही गैरप्रकार पुढे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून, पालक आणि गावकऱ्यांमध्ये या घटनेमुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे.