शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:33 IST

सेलू हद्दीतील दारुविक्रेत्याची एम.पी.डी.ए. अंतर्गत छत्रपती संभाजीनगर कारागृहात रवानगी

वर्धा जिल्हयातील सेलू पोलीस स्टेशन हद्दीत सतत गुन्हे करणाऱ्या दारुविक्रेत्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सेलू हद्दीतील दारुविक्रेत्याची एम.पी.डी.ए. अंतर्गत छत्रपती संभाजीनगर कारागृहात रवानगी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पोलीस स्टेशन, सेलू हद्दीतील प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धाबर्डे (वय ४८, रा. तळोदी, ता. सेलू, जि. वर्धा) या दारुविक्रेत्यावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धाबर्डे याचेविरुध्द पोलीस स्टेशन, सेलूच्या अभिलेखावर सन २०१७ पासून महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकूण २७ गुन्हे नोंद आहेत. सन २०१७ पासून हा इसम सेलू परिसरात कार्यरत असून त्याने जनसामान्यांच्या मनात स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याच्याविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार द्यायलाही धजावत नव्हते. यामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होऊन सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले होते.

प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धाबर्डे याच्या या कृत्यांमुळे सेलू पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था वारंवार भंग होत असल्याने आणि त्याची गुन्हेगारी कारवाई थांबत नसल्याने याआधीच त्याच्याविरुध्द कलम ९३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ आणि कलम ५६(१)(अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये त्याला ०६ महिन्यांच्या कालावधीसाठी वर्धा जिल्हयातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र या प्रतिबंधक कारवाईलाही तो जुमानला नाही आणि त्यानंतरही सतत गुन्हे करत राहिला.

यामुळे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पंकज वाघोडे (पोलीस स्टेशन, सेलू) यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्येविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्यामार्फत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी. यांच्याकडे सादर केला होता.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानबध्द आदेश जारी करून प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धाबर्डे यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले. या आदेशान्वये त्याला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

वर्धा जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आगामी गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी हे सण उत्सव शांततेत पार पडावेत या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारू विकणाऱ्या तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे पुन्हा एकदा संकेत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी. आणि पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ