आता QR कोड स्कॅन न करता पेमेंट, UPI Tap & Pay आणि MyUPI लाँच
RBI आणि NPCI यांनी मुंबईतील Global Fintech Fest 2026 मध्ये दोन नवीन फीचर आणले, ज्यामुळे UPI पेमेंट अजून सोपं होणार आहे.
UPI मुळे भारतात पेमेंट करणं खूपच सोपं झालंय, अगदी चहाच्या टपरीपासून मॉलपर्यंत सगळीकडे UPI चालतं. पण एक अडचण नेहमी येते ती म्हणजे नेट नसलं की Google Pay, PhonePe सारखे ॲप अडकून बसतात. दुकानात गर्दी असते आणि पेमेंट काही होत नाही. या कटकटीतून सुटका व्हावी म्हणून RBI आणि NPCI यांनी आता एक नवीन फीचर आणलंय.
मुंबईत सुरू असलेल्या Global Fintech Fest 2026 मध्ये हे फीचर लाँच करण्यात आलं. RBI चे गव्हर्नर आणि NPCI यांनी मिळून दोन नवीन गोष्टी आणल्या आहेत, एक UPI Tap & Pay आणि दुसरं MyUPI. या दोन्हीमुळे UPI वापरणं आणखी सोपं होणार आहे.
Tap & Pay म्हणजे नक्की काय, तर आपण जसं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मशीनवर टॅप करून पेमेंट करतो, तसंच आता मोबाईलनेही करता येणार आहे. यापुढे QR कोड शोधायची गरज नाही, कॅमेरा ओपन करायची गरज नाही आणि पुन्हा पुन्हा ॲप ओपन करून पिन टाकायचीही गरज नाही. फोनमध्ये NFC सपोर्ट असेल तर फक्त फोन अनलॉक करायचा आणि दुकानदाराच्या PoS मशीनवर टॅप करायचा, पेमेंट होऊन जाईल.
यात दुकानदाराच्या मशीनचं इंटरनेट वापरलं जातं, त्यामुळे तुमचं स्वतःचं नेट स्लो असलं तरी पेमेंट अडकणार नाही. जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो अशा गावात, खेड्यात राहणाऱ्या लोकांसाठी हे फीचर एकदम फायद्याचं ठरणार आहे. आता नेटसाठी थांबत बसायची गरज नाही, फक्त एक टॅप केलं की काम होणार.
NPCI ने आणखी एक चांगली गोष्ट केलीय, ती म्हणजे 5000 रुपयांपर्यंतच्या छोट्या पेमेंटसाठी आता UPI पिन टाकायची गरज नाही. टॅप केलं की थेट पेमेंट होईल. 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तरच पिन टाकावा लागेल. यामुळे भाजी घेणं, चहा पिणं, ऑटोचं भाडं देणं अशा छोट्या कामांसाठी पेमेंट एकदम फास्ट होणार आहे.
Tap & Pay सोबतच MyUPI नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्मही लाँच झालंय. हे एक AI बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. बऱ्याच जणांची 2-3 बँक अकाउंट असतात, 2-3 UPI आयडी असतात, त्यामुळे सगळ्याचा हिशोब ठेवणं अवघड होऊन बसतं. MyUPI मध्ये तुमच्या सगळ्या UPI व्यवहारांची माहिती एकाच जागी दिसेल, किती पैसे आले, कुठे खर्च झाले, कोणत्या बँकेतून झाले, हे सगळं एका क्लिकवर कळणार आहे. काही अडचण आली तर AI सपोर्टही लगेच मदत करेल, त्यामुळे वेगवेगळ्या ॲपमध्ये जाऊन हिस्ट्री बघायची गरज उरणार नाही.
एकंदरीत आता UPI वापरणं कार्ड पेमेंट इतकंच सोपं झालंय. नेटचा प्रॉब्लेम, QR स्कॅन करण्यात जाणारा वेळ, ॲप हँग होणं या सगळ्या अडचणींतून सुटका मिळणार आहे. Google Pay आणि PhonePe सारख्या ॲप्सनाही आता हे फीचर त्यांच्या ॲपमध्ये आणावं लागणार आहे, आणि लवकरच सगळ्यांच्या फोनमध्ये हा ऑप्शन दिसायला लागेल.