टीआयएसएस विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अभाविपची आंदोलने, वैद्यकीय सुविधांची मागणी
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस कॅम्पसमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी अभाविपने प्रशासनाला निवेदन दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याला वेळेत प्राथमिक वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बुधवारी टीआयएसएस कॅम्पसमध्ये निदर्शने केली. अभाविप मुंबई आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला यावेळी निवेदनही सादर करण्यात आले.
ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्याचे नाव डॉ. जनार्दनन पी. असे आहे. कॅम्पसमध्ये त्याला वेळेत प्राथमिक वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्याची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपत्कालीन प्रसंगी विद्यार्थ्यांना वेळेवर रुग्णवाहिका आणि आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी अभाविपने केली आहे.
अभाविपने प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. कॅम्पसमध्ये चोवीस तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिका असावी, तसेच बॅकअप रुग्णवाहिकेचीही सोय करावी, अशी पहिली मागणी आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्पष्ट अशी कार्यपद्धती (एसओपी) आणि हेल्पलाइन सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली. बीएआरसी हॉस्पिटल किंवा जवळपासच्या एखाद्या सुपर-स्पेशालिटी रुग्णालयासोबत करार करून विद्यार्थ्यांना तातडीच्या उपचारांची सोय उपलब्ध करून द्यावी, असेही अभाविपने म्हटले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य आणि अपघात विमा संरक्षण द्यावे, तसेच टीआयएसएसच्या हेल्थ सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक औषधे आणि आपत्कालीन उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्याही यात आहेत.
अभाविप मुंबईचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूने संपूर्ण विद्यार्थी समुदायाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर टीआयएसएस प्रशासनाने कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेचा गांभीर्याने आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे." पवार पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत आणि योग्य रुग्णालयात तातडीने उपचार मिळणे ही मूलभूत गरज आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता या मागण्यांवर ठोस आणि ठराविक वेळेत कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या प्रश्नावर अभाविप मुंबई कोणतीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट करत या मागण्यांवर येत्या दहा दिवसांत ठोस, दृश्यमान आणि समाधानकारक कार्यवाही करावी, अशी मागणी अभाविप मुंबईने केली आहे.