Tata Sierra Legend Series बाजारात दाखल, सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये
टाटा मोटर्सने सिएराच्या लोकप्रिय रेंजमध्ये पाच नव्या व्हेरिएंट्ससह Legend Series आणली असून, कमी बजेटमध्येही प्रीमियम फीचर्स देण्यावर भर दिला आहे.
Tata Motors ने आपल्या Sierra SUV च्या रेंजमध्ये नवी भर घातली असून, Legend Series या नावाने नवी सीरिज भारतीय बाजारात लाँच केली आहे. या सीरिजची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सध्याची Sierra रेंज बाजारात कायम राहणार असून, Legend Series ही त्याला जोडून विकली जाणार आहे.
या नव्या सीरिजचं खास वैशिष्ट्य म्हणजे आता ग्राहकांना कमी किमतीच्या व्हेरिएंटपासूनच जास्त प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत. एकूण पाच ट्रिम्स आणि 18 व्हेरिएंट्स या सीरिजमध्ये देण्यात आले आहेत.
Smart+ L, Pure L, Pure L(O), Pure+ L आणि Adventure+ L अशी या पाच ट्रिम्सची नावं आहेत. किंमत 11.99 लाखांपासून सुरू होऊन टॉप Adventure+ L व्हेरिएंटसाठी 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. वेगवेगळ्या बजेटमध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केल्याचं यातून दिसतं.
सगळ्यात बेसिक असलेल्या Smart+ L मध्ये लेदरेट सीट्स आणि इंटिरियर, ऑटो-फोल्डिंग ORVMs, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि रूफ रेल्स असे फीचर्स आहेत. त्यापुढच्या Pure L मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, रिअर कॅमेरा, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि TPMS यांची भर पडते.
Pure L(O) या व्हेरिएंटमध्ये पॅनोरामिक सनरूफ, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि रेन-सेंसिंग वायपर्स दिले आहेत. त्यानंतरच्या Pure+ L मध्ये प्रीमियम अनुभव आणखी वाढवला असून, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 6-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, थाय सपोर्ट एक्स्टेंडर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि Boss Mode सारख्या सुविधा यात मिळतात. मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनाही जास्त आराम मिळावा यासाठी कंपनीने खास लक्ष दिलं आहे. Legend Series मधल्या काही व्हेरिएंट्सची किंमत त्यांच्या स्टँडर्ड व्हेरिएंटपेक्षा साधारण 50 ते 70 हजार रुपयांनी जास्त आहे.
टॉप ट्रिम असलेल्या Adventure+ L मध्ये सगळ्यात जास्त हायटेक फीचर्स ठेवण्यात आले आहेत. यात 360-डिग्री HD कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, टेरेन मोड्स, फ्रिक्वेन्सी-डिपेंडंट डॅम्पर्स, ड्युअल मोठ्या स्क्रीन, रिअर सीट रिक्लाइन फंक्शन, अॅम्बियंट लाइटिंग, कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि वायरलेस चार्जिंग यांचा समावेश आहे.
इंजिनमध्ये मात्र फार मोठा बदल केलेला नाही. Sierra मध्ये पेट्रोल, डिझेल आणि टर्बो-पेट्रोल असे 1.5-लिटर इंजिनचे पर्याय आधीसारखेच आहेत. व्हेरिएंटनुसार मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि DCT गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. त्यामुळे नव्या Legend Series मुळे जास्त फीचर्स आणि प्रीमियम केबिन अनुभव देत Sierra ची संपूर्ण रेंज आणखी विस्तारली गेली आहे.