ॲक्सेस 125 विरुद्ध ज्युपिटर 125: किंमत जवळपास सेम, पण स्टोरेज आणि फीचर्समध्ये मोठा फरक
125cc स्कूटर सेगमेंटमध्ये सुझुकी ॲक्सेस 125 आणि टीव्हीएस ज्युपिटर 125 यांच्यात जोरदार टक्कर, दोन्हीच्या किमती जवळपास सारख्याच पण स्टोरेज, ब्रेक आणि डिस्प्लेमध्ये फरक.
125cc स्कूटर विकत घ्यायचा विचार करणाऱ्यांसाठी सध्या बाजारात दोन गाड्यांची जोरदार चुरस पाहायला मिळतेय. सुझुकी ॲक्सेस 125 आणि टीव्हीएस ज्युपिटर 125 या दोन्ही गाड्या जवळपास एकाच किमतीत मिळतात, त्यामुळे नेमकी कोणती घ्यावी हा प्रश्न ग्राहकांना पडणे साहजिक आहे. दिल्लीतील एक्स-शोरूम किमतीनुसार ॲक्सेस 125 ची सुरुवातीची किंमत 82,185 रुपये आहे, तर ज्युपिटर 125 च्या ड्रम अलॉय व्हेरियंटची किंमत 81,700 रुपये आहे. दोन्ही गाड्यांमध्ये सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड 125cc इंजिन दिलंय, पण कागदावर सेम दिसणाऱ्या या इंजिनांमध्ये आणि गाडीच्या बांधणीत बरेच फरक आहेत.
व्हेरियंटनुसार बघायचं झालं तर ॲक्सेस 125 मध्ये स्टँडर्ड एडिशन ड्रम ब्रेक व्हेरियंट 82,185 रुपयांना, स्पेशल एडिशन डिस्क ब्रेक व्हेरियंट 88,627 रुपयांना, राइड कनेक्ट एडिशन डिस्क ब्रेक विथ अलॉय व्हील 90,727 रुपयांना, राइड कनेक्ट TFT एडिशन 93,877 रुपयांना, राइड कनेक्ट ABS एडिशन 97,030 रुपयांना आणि राइड कनेक्ट TFT ABS एडिशन 1.02 लाख रुपयांना मिळतो. ज्युपिटर 125 चा ड्रम-अलॉय व्हेरियंट 81,700 रुपयांना, डिस्क व्हेरियंट 86,110 रुपयांना, DT SXC 88,950 रुपयांना आणि स्मार्टएक्सकनेक्ट व्हेरियंट 89,935 रुपयांना उपलब्ध आहे.
पॉवरच्या बाबतीत ॲक्सेस 125 6,500 आरपीएमवर 6.2kW म्हणजे साधारण 8.3hp पॉवर आणि 5,000 आरपीएमवर 10.2Nm टॉर्क देते. तर ज्युपिटर 125 6,500 आरपीएमवर 6.0kW म्हणजे साधारण 8hp पॉवर आणि 4,500 आरपीएमवरच 10.5Nm इतका थोडा जास्त टॉर्क देते. ज्युपिटरचा टॉर्क कमी आरपीएमला मिळत असल्याने ट्रॅफिकमध्ये सुरुवातीचा पिकअप चांगला मिळतो, तर टॉप स्पीडला ॲक्सेस 125 थोडी पुढे राहते.
स्टोरेजच्या बाबतीत मात्र दोन्हीत मोठा फरक आहे. ज्युपिटर 125 मध्ये तब्बल 33 लीटरची अंडर-सीट स्टोरेज मिळते, तर ॲक्सेस 125 मध्ये फक्त 24.4 लीटर जागा आहे. रोज हेल्मेट, भाजीपाला किंवा बॅग वागवणाऱ्यांसाठी त्यामुळे ज्युपिटर जास्त सोयीची ठरते. सीटच्या लांबीबद्दल टीव्हीएसचा दावा आहे की ज्युपिटरची 790 मिमी सीट सेगमेंटमध्ये सर्वात मोठी आहे, पण सुझुकीच्या ऑफिशियल स्पेसिफिकेशननुसार ॲक्सेस 125 ची सीट 856 मिमी लांब आहे. त्यामुळे कम्फर्ट स्वतः शोरूममध्ये जाऊन बघणंच योग्य.
ब्रेकिंगबाबत दोन्ही गाड्यांच्या ठराविक व्हेरियंटमध्येच फ्रंट डिस्क ब्रेक मिळतो. ज्युपिटरच्या डिस्क व्हेरियंटमध्ये 220 मिमी फ्रंट डिस्क आणि टीव्हीएसची सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी (SBT) आहे, तर ॲक्सेस 125 च्या राइड कनेक्ट व्हेरियंटमध्ये फ्रंट डिस्क आणि कंबाइन्ड ब्रेक सिस्टीम (CBS) दिलीय. फीचर्सच्या बाबतीत ॲक्सेसच्या टॉप व्हेरियंटमध्ये 4.2 इंचाचा कलर TFT क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन मिळतं. ज्युपिटर 125 च्या डिस्क व्हेरियंटमध्ये मात्र साधा सेमी-डिजिटल स्पीडोमीटर आहे.
ज्यांना जास्त बूट स्पेस आणि शहरातल्या ट्रॅफिकमध्ये पटकन पिकअप हवा आहे त्यांनी ज्युपिटर 125 घ्यावी. ज्यांना मॉडर्न कनेक्टेड फीचर्स, TFT स्क्रीन आणि थोडी जास्त पॉवर हवी त्यांच्यासाठी ॲक्सेस 125 बेस्ट ठरते. दोन्ही गाड्यांची किंमत जवळपास सारखीच असल्याने आपल्या रोजच्या गरजेनुसार फीचर्स ठरवणंच फायद्याचं.