सोन्याचे दागिने घरच्याघरी चकाचक करण्याच्या सोप्या पद्धती
सोनाराकडे न नेता घरातल्या घरात सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स.
लग्नकार्यापासून घरगुती कार्यक्रमांपर्यंत आणि सणासुदीला देवाच्या पूजेसाठीसुद्धा सोन्याच्या दागिन्यांना आपल्याकडे खास महत्त्व आहे. गळ्यातला हार असो, बोटातली अंगठी, हातातल्या बांगड्या किंवा कानातले, सोनं घातलं की लूक एकदम खुलून येतो. पण बरेच जण रोजच्या रोज सोनं अंगावर घालतात, त्यामुळे हळूहळू त्याची चमक कमी होत जाते. चांदीसारखं सोन्याला गंज चढत नाही, तरी सतत वापरामुळे ते काळवंडतं आणि त्यावर घाण साचते.
सण जवळ आला की अनेक घरांत बँकेच्या लॉकरमधून सोनं बाहेर काढलं जातं आणि चकाचक करण्यासाठी ते सोनाराकडे नेलं जातं. पण प्रत्येक वेळी सोनाराकडे जाण्याची गरज नाही, घरच्या घरीसुद्धा काही सोप्या पद्धतींनी हे दागिने स्वच्छ करता येतात.
भांडी धुण्याच्या साबणाने सुद्धा सोन्याचे दागिने स्वच्छ करता येतात. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्यायचं आणि त्यात लिक्विड डिश डिटर्जंट टाकायचं. चांगला रिझल्ट हवा असेल तर सोडियम नसलेलं सेल्टझर वापरावं, त्यातल्या कार्बन वायूमुळे दागिन्यांवरची घाण आणि मळ सैल व्हायला मदत होते. मऊ केसांच्या टूथब्रशने हळुवारपणे दागिने घासून घ्यायचे आणि नंतर वाहत्या पाण्याखाली धुवायचे. शेवटी सुती कापडाने दागिने कोरडे पुसून घ्यायचे.
टूथपेस्ट वापरूनही दागिने स्वच्छ करता येतात. एक ते दोन चमचे पाण्यात साधारण एक इंच टूथपेस्ट मिसळून पातळसं द्रावण तयार करायचं. हवं असल्यास कापड किंवा जुना ब्रश वापरून दागिन्यांवरची घाण घासून काढता येते. नंतर स्वच्छ पाण्याखाली दागिने पूर्ण धुवून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, धुतल्यानंतर दागिने ओले तसेच ठेवायचे नाहीत, नाहीतर त्यावर डाग पडू शकतात.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरूनही सोनं स्वच्छ करता येतं. एका भांड्यात पाव कप बेकिंग सोडा आणि दोन मोठे चमचे कोमट पाणी घालून पेस्ट तयार करायची, पाणी जास्त गरम नसावं याची काळजी घ्यायची. ही पेस्ट दागिन्यांवर चोळायची आणि नंतर व्हिनेगरने आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची.
काही गोष्टींची काळजी मात्र घ्यायला हवी. सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कधीही ब्लीच वापरू नये, त्यामुळे दागिन्यांचा रंग बदलू शकतो. ओपल स्टोन खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांच्यावर टूथपेस्ट किंवा कोणतंही क्लिनर वापरणं टाळावं, त्याऐवजी टिश्यू पेपरने पुसणं बरं. तसंच सोन्याचे दागिने नेहमी इतर दागिन्यांपासून वेगळे ठेवावेत, म्हणजे त्यावर लवकर ओरखडे येत नाहीत. या सोप्या पद्धतींनी सोनाराकडे न जाता घरच्या घरीच सोन्याच्या दागिन्यांची काळजी घेता येते.