शिव ठाकरेचा वाढदिवस: पेपर टाकण्यापासून 'द ५०' जिंकण्यापर्यंतचा प्रवास
आज ९ सप्टेंबर रोजी अभिनेता शिव ठाकरे वाढदिवस साजरा करतोय. 'द ५०' या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचं विजेतेपद मिळवणाऱ्या शिवचा सुरुवातीचा प्रवास मात्र खूप खडतर होता.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा शिव ठाकरे आज, ९ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा करत आहे. 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाड़ी' सारख्या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेल्या शिवने आता 'द ५०' या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची ट्रॉफीही आपल्या नावावर केली आहे. पण आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवचा हा प्रवास सुरुवातीपासूनच सोपा नव्हता. आर्थिक अडचणी आणि संघर्षातून सुरू झालेला हा प्रवास आज मोठ्या विजेतेपदापर्यंत पोहोचला आहे.
शिव ठाकरे मूळचा अमरावतीच्या एका साध्या मराठी कुटुंबातला. या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर शिव झोपडपट्टीतही राहिला होता. या परिस्थितीशी झगडत असतानाच त्याने लहान वयातच घराला हातभार लावायला सुरुवात केली.
'रोडीज'च्या ऑडिशनच्या वेळी शिवने स्वतःच आपल्या संघर्षाबद्दल सांगितलं होतं. घरासाठी पैसे मिळावेत म्हणून त्याने वडिलांच्या पानटपरीवर काम केलं. यासोबतच कधी पेपर टाकायचं काम केलं, तर कधी दूधाची पाकिटं विकली. या सगळ्यात त्याची मोठी बहीणही त्याला साथ द्यायची.
याच काळात शिवने आपल्या नृत्यकौशल्याचाही पैसे कमावण्यासाठी वापर केला. आजूबाजूच्या मुलांना तो नृत्य शिकवायचा, आणि यातून त्याला महिन्याला १० हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत कमाई व्हायची. या पैशातून तो घराला मदत करायचा, स्वतःचा खर्च भागवायचा आणि बहिणीच्या लग्नासाठी थोडी थोडी बचतही करायचा. त्याच्या या मेहनतीमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारली आणि ते झोपडपट्टीतून थोड्या बऱ्या जागी राहायला गेले.
शिवच्या करिअरला खरी सुरुवात झाली ती 'रोडीज' या रिअॅलिटी शोपासून. ऑडिशनमध्ये त्याने केवळ आपली कला दाखवली असं नाही, तर आपल्या आयुष्यातला संघर्ष आणि घरची परिस्थितीही स्पष्टपणे मांडली. त्याचा आत्मविश्वास आणि त्याची संघर्षगाथा ऐकून तिथले गँग लीडर्स प्रभावित झाले आणि अनेकांना त्याला स्वतःच्या गँगमध्ये घ्यायचं होतं. मात्र शिवने रणविजयच्या गँगमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. निवड झाली तर रणविजयच्याच टीममध्ये जाईन, असं वचन त्याने आधीच आईला दिलं होतं. हे ऐकून रणविजयही भावुक झाला होता. या शोमध्ये शिव सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता.
'रोडीज'नंतर शिवच्या करिअरला मोठं वळण मिळालं. त्याला 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, आणि तिथे आपल्या चतुर खेळीने आणि रणनीतीने त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. अखेर त्याने 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी जिंकली आणि त्याची लोकप्रियता आणखी वाढली. त्यानंतर 'बिग बॉस हिंदी'मध्येही त्याने आपल्या खेळाची छाप उमटवली. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर परिस्थिती बदलता येते, हे शिवच्या या प्रवासातून दिसून येतं.