सेवाग्राममध्ये जुगार अड्डयावर पोलिसांची धाड, सहा जणांना अटक, 11 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त
सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात एका कंपनीच्या मोकळया शेडखाली जुगार खेळत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
सेवाग्राम एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण 11 लाख 5 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई 9 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आली. सेवाग्राम पोलीस स्टेशनला एका मुखबिराकडून खबर मिळाली होती की एमआयडीसी सेवाग्राम परिसरातील अक्षय बुरांडे यांच्या सिमेंट विटा बनवण्याच्या कंपनीतील मोकळया जागेत, टिनाच्या शेडखाली काही इसम 52 पत्त्यांच्या सहाय्याने पैशांचा हार-जीत जुगार खेळत आहेत. या खबरेच्या आधारावर ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टॉप पथकाने सापळा रचला.
पंचांसमक्ष सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला, तेव्हा सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जागेवरच 52 पत्ते, डावावरील रोख 13 हजार रुपये, दोन टेबल फॅन किंमत 5 हजार रुपये, नऊ प्लास्टिकच्या खुर्च्या किंमत 4 हजार 500 रुपये आणि तीन प्लास्टिक टेबल किंमत 3 हजार रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला. यासोबतच आरोपींच्या ताब्यातून व अंगावरून तसेच मोक्यावरून मोटरसायकल, कार आणि मोबाईल असा एकूण 11 लाख 5 हजार 550 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बोरगाव मेघे येथील रहिवासी गजानन मनोहर गिरडकर (वय 38), हेमंत देवचंद सावरकर (वय 36) आणि भूषण अर्जुनराव वैद्य (वय 34) यांचा समावेश आहे. यासोबतच वर्धा येथील आनंद नगर येथील अब्दुल रजा अब्दुल रउफ (वय 38), वर्धा येथील आर्वी नाका येथील अयान रहीम शेख (वय 24) आणि सोनेगाव स्टेशन येथील रहिवासी असलेले पण सध्या सिद्धार्थ नगर बोरगाव मेघे येथे राहणारे समीर रुस्तम सय्यद (वय 40) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टॉप पथकातील पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक बाबर्डे, सहायक फौजदार सुनील पाऊलझाडे, सहायक फौजदार मारोती काटकर, पोलीस हवालदार संदीप मेंढे, पोलीस हवालदार संजय लाडे, नायक पोलीस शिपाई स्वप्नील नायक, पोलीस शिपाई धिरज चालक, पोलीस हवालदार विलास लोहकरे आणि पोलीस शिपाई निलेश यांनी ही कामगिरी पार पाडली.