सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; 'आर्या'मध्ये 'रिव्हरडेल' फेम रॉस बटलरसह झळकणार
अभिनेत्री सयानी गुप्ता अमेरिकन फीचर फिल्म 'आर्या'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून, रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन हेही या चित्रपटात असतील.
अभिनेत्री सयानी गुप्तासाठी हे वर्ष नव्या कामांनी भरलेलं ठरतंय. तिच्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या 'आसमानी' या लघुपटाला जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाद मिळत असतानाच, आता तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एक टप्पा जोडला गेलाय. सयानी अमेरिकन फीचर फिल्म 'आर्या'मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत 'रिव्हरडेल' आणि '13 Reasons Why' या मालिकांमुळे ओळखला जाणारा रॉस बटलर आणि 'ब्रुकलिन नाइन-नाइन' फेम मार्क इव्हान जॅक्सन हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नील तुली यांनी 'आर्या' लिहिलाय आणि दिग्दर्शितही केलाय, फीचर फिल्ममधलं हे त्यांचं दिग्दर्शकीय पदार्पण आहे.
सिनेमात सयानी एका प्रतिष्ठित भारतीय संगीत संस्थेतल्या शिस्तप्रिय पियानो शिक्षिकेची भूमिका करतेय. तिच्यासोबत अर्जुन गुप्ता, आदी रॉय, कायरा लेरॉक्स आणि इक्बाल थेबा हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. 'आर्या'मधून सयानी पहिल्यांदाच एका अमेरिकन स्वतंत्र निर्मिती असलेल्या फीचर फिल्ममध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करतेय. आतापर्यंत भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजमधून ओळखली जाणारी सयानी, आता थेट अमेरिकन इंडिपेंडंट सिनेमाच्या केंद्रस्थानी असलेली भूमिका साकारताना दिसणार आहे, हे या पदार्पणाचं वैशिष्ट्य आहे.
कथेबद्दल बोलायचं झालं तर, सयानीची व्यक्तिरेखा कामासाठी नाराजीनेच उत्तर मिनेसोटाला जाते, जिथे तिच्यावर एका अडचणीत सापडलेल्या बँड प्रोग्रामला सावरण्याची जबाबदारी येते. दुसरीकडे भारतात स्वतःच्या करिअरच्या महत्त्वाकांक्षा पुढे नेण्याचं आव्हानही तिच्यासमोर असतं. म्हणजेच एकाच वेळी दोन आघाड्यांवर, कामाच्या ठिकाणी आणि स्वतःच्या करिअरमध्ये तिला तारेवरची कसरत करावी लागते. उत्तर मिनेसोटात पोहोचल्यावर मात्र गोष्टी वेगळं वळण घेतात, काही गोंधळ झाल्यानंतर तिला स्वतःच्या वैयक्तिक असुरक्षिततेलाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे 'आर्या' ही फक्त एका संगीत शिक्षिकेची गोष्ट न राहता तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाची कहाणी बनते.
मुख्य भूमिकेसोबतच सयानी या चित्रपटात कार्यकारी निर्मातीचीही जबाबदारी सांभाळतेय. विशेष म्हणजे रॉस बटलरही या प्रोजेक्टसाठी कार्यकारी निर्माता म्हणून जोडला गेलाय. म्हणजेच पडद्यावरच्या भूमिकेसोबतच पडद्यामागच्या निर्णयांतही सयानीचा सहभाग असणार आहे.
सयानीने अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकलंय. तिने 'आसमानी' हा लघुपट लिहिलाय आणि तयारही केलाय, आणि या लघुपटाला जगभरातल्या विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाद मिळतेय. वॉशिंग्टन डीसीपासून टोकियो आणि केरळपर्यंत 'आसमानी'चा महोत्सवी प्रवास सुरू असतानाच, सयानी आता 'आर्या'मधून अमेरिकन चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतेय. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून सयानी गुप्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख तयार करताना दिसतेय.