येमेन सीमेजवळ अमेरिकेचा 'लेव्हल-4' प्रवास बंदी इशारा, सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांवरही निर्बंध
येमेन सीमेवरील हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सौदी अरेबियासाठी नवा प्रवास सल्ला जारी केला असून सीमावर्ती भागासाठी सर्वात कडक बंदी लागू केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सौदी अरेबियात राहणाऱ्या आणि तिथे जाऊ इच्छिणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा नवा सुरक्षा सल्ला जारी केला आहे. येमेनच्या सीमेजवळच्या भागात दहशतवाद वाढतोय, सशस्त्र संघर्ष सुरू आहे आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी बंडखोरांकडून सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. हे सगळं लक्षात घेऊन अमेरिकेने सौदीच्या प्रवासाला 'स्तर-3' म्हणजे Reconsider Travel या यादीत टाकलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर अमेरिकन नागरिकांनी सध्या सौदी अरेबियाचा प्रवास टाळावा किंवा त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करावा, असं यात म्हटलंय.
येमेनच्या सीमेला लागून असलेल्या भागासाठी मात्र अमेरिकेने याहून कडक असा 'स्तर-4' म्हणजे Do Not Travel चा इशारा दिला आहे. या भागातली सुरक्षा परिस्थिती खूपच बिघडली असून तिथे दहशतवादी कारवाया आणि लष्करी संघर्षाचा थेट धोका असल्याचं परराष्ट्र विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत या सीमावर्ती भागात जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
येमेनमधल्या सशस्त्र हुथी गटांनी सौदीतील सीमावर्ती शहरं, लष्करी तळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महत्त्वाचे ऊर्जा प्रकल्प यांना लक्ष्य केलं आहे. युरोप आणि आशियातल्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांवर थेट हल्ले होत आहेत किंवा क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. यासोबतच अमेरिकन प्रशासनाने आणखी एका धोक्याबद्दल आपल्या नागरिकांना सावध केलं आहे. सौदीची प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा हुथींचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र आकाशातच रोखते, पण त्यातून तयार होणारा जळता मलबा थेट जमिनीवर, वस्तीच्या भागात किंवा ऊर्जा प्रकल्पांवर पडतो. हा मलबा खूपच जीवघेणा ठरत असल्याने लष्करी तळ आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांजवळ राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या जीवाला मोठा धोका आहे.
परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात घेऊन अमेरिकन सरकारने सौदीतल्या स्वतःच्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही कडक प्रवास निर्बंध लादले आहेत. अमेरिकन कर्मचाऱ्यांना येमेनी सीमेपासून 20 मैल म्हणजे साधारण 32 किमीच्या आत प्रवास करायला सक्त मनाई आहे. याशिवाय कतीफ प्रांतात गरज नसताना प्रवास करण्यावर बंदी घातली आहे, तर जिझान, असिर आणि नजरान या सीमावर्ती प्रांतांमध्ये जायचं असेल तर अमेरिकन दूतावासाची खास परवानगी घेणं बंधनकारक केलं आहे.
हा इशारा अशा वेळी आला आहे जेव्हा सौदीतील मक्का आणि जेद्दाह या पवित्र आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये आधीच उच्च सुरक्षा इशारा दिला होता. 15 सप्टेंबर रोजी सौदीच्या हवाई संरक्षण दलाने मक्का शहराच्या दक्षिणेकडील बंदी असलेल्या हवाई हद्दीत घुसणारा एक हुथी ड्रोन आकाशातच शोधून उद्ध्वस्त केला होता. पवित्र क्षेत्राच्या सुरक्षेला निर्माण झालेला हा धोका सौदी प्रशासनासाठी रेड लाईन मानला जातोय.
या सुरक्षेच्या तणावाबरोबरच अमेरिकेने आपल्या नागरिकांना सौदीतल्या कडक स्थानिक कायद्यांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सौदी सरकार किंवा त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणं, लाईक करणं किंवा त्यावर कमेंट करणं महागात पडू शकतं. आधी परदेशात असताना केलेल्या सोशल मीडिया पोस्टसाठीसुद्धा सौदीत लोकांना अटक झाली असून 45 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. तसंच कोणत्याही आर्थिक, कौटुंबिक किंवा दिवाणी वादांमुळे नागरिकांना देश सोडण्यास मनाई म्हणजे एक्झिट बॅन लावला जाऊ शकतो, जो कित्येक वर्षं लागू राहू शकतो.