व्हॉट्सअॅपवर हॅकर्सचा नवा डाव, ओळखीच्या नंबरवरून फाईल पाठवून चोरतायेत डेटा
क्विक हील या सायबर सिक्युरिटी कंपनीने व्हॉट्सअॅपवरील नव्या स्कॅमबद्दल इशारा दिला आहे. हॅकर्स आधी एखाद्याचं अकाउंट हॅक करतात आणि मग त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना संशयास्पद फाईल पाठवतात.
व्हाट्सऐप हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. फोटो पाठवणं असो, व्हिडिओ असो किंवा ऑफिसची कागदपत्रं असो, सगळं व्यवहार याच अॅपवरून चालतं. पण आता याच व्हॉट्सअॅपचा वापर करून लोकांना फसवण्याचा नवा प्रकार सुरू झाला आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी क्विक हीलने याबद्दल मोठा इशारा दिला आहे. हॅकर्स व्हॉट्सअॅपवरून फोनमध्ये व्हायरस असलेल्या फाईल्स पाठवत आहेत आणि याची लोकांना कल्पनाही येत नाही.
हे हॅकर्स नेमकं कसं फसवतात, याची पद्धत बरीच हुशारीची आहे. आधी हे लोक कोणाचं तरी व्हाट्सऐप अकाउंट हॅक करतात. त्यानंतर त्या नंबरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या सगळ्या नंबरना ते एक फाईल पाठवतात. आता विचार करा, ऑफिसच्या बॉसकडून किंवा मित्राकडून एखादी फाईल आली तर काय करणार? नंबर ओळखीचा असल्यामुळे लगेच उघडून पाहणार, हे साहजिकच आहे. आणि नेमका याच विश्वासाचा फायदा हॅकर्स घेतात.
फाईल आपल्या ओळखीच्या माणसाकडून आली असं वाटत असतं, पण खरं तर ती हॅकरने पाठवलेली असते. ही फाईल दिसायला अगदी खरी वाटते, जसं की बिझनेसचा रिपोर्ट, बिल किंवा ऑफिसचं डॉक्युमेंट असावं. फाईलला नावही तसंच दिलेलं असतं, जेणेकरून ती खरी वाटावी. एकदा ही फाईल उघडली की फोनमधला सगळा डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतो.
क्विक हीलने सांगितलं आहे की, हे हॅकर्स रँडम लोकांना टार्गेट करत नाहीत. ते मुद्दाम मोठ्या लोकांना निशाणा बनवतात, म्हणजे कंपनीच्या फायनान्स टीममधले लोक, मोठे अधिकारी, सीए आणि बिझनेस करणारे लोक. कारण यांच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये पैशांचे व्यवहार आणि कंपनीची गुप्त माहिती असते. ती माहिती मिळाली की हॅकर्सचा मोठा फायदा होतो. आणि हे लोक सतत आपली पद्धत बदलत राहतात, त्यामुळे त्यांना पकडणंही अवघड जातं.
यापासून वाचायचं कसं, याबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. घाबरून जाण्याची गरज नाही, पण थोडं सावध राहायला हवं. सगळ्यात आधी, ओळखीच्या माणसाकडून फाईल आली तरी अचानक का पाठवली असेल असा प्रश्न पडत असेल, तर लगेच डाउनलोड करू नये, आधी थांबावं. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे फोन करून खात्री करणे. मित्राकडून फाईल आली असेल तर त्याला डायरेक्ट फोन करून विचारावं, फाईल पाठवली का. त्याने नाही म्हटलं तर काहीतरी गडबड आहे हे समजून जावं.
कोणतीही विचित्र फाईल आली तर ती दुसऱ्याला फॉरवर्ड करू नये, कारण त्यामुळे स्वतःही फसू शकतो आणि दुसराही फसू शकतो. फोनचं सॉफ्टवेअर आणि अँटिव्हायरस नेहमी अपडेट ठेवावं, कारण जुन्या सॉफ्टवेअरमध्ये हॅकर्स सहज घुसू शकतात. फाईलचं नाव विचित्र असेल, जसं की abc.exe.pdf अशा प्रकारचं, तर ती उघडूच नये, सरळ डिलीट करून टाकावी. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, व्हॉट्सअॅपवर नंबर ओळखीचा असला तरी मेसेज पाठवणारी व्यक्ती तीच आहे याची खात्री नसते. त्यामुळे थोडं सावध राहिलं तर फोन आणि माहिती दोन्ही सुरक्षित राहतील.