गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:47 IST

'सनई चौघडे'त यंदा दिसणार कोकणातला पारंपरिक गणेशोत्सव, परब कुटुंब गावी जाणार

झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत यंदा कोकणातल्या गणेशोत्सवाचा खास ट्रॅक दाखवला जाणार असून शर्वरीची भूमिका करणाऱ्या चिन्मयी साळवीने शूटिंगचा अनुभव सांगितला.

'सनई चौघडे'त यंदा दिसणार कोकणातला पारंपरिक गणेशोत्सव, परब कुटुंब गावी जाणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि राज्यभर बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. कोकणातला गणेशोत्सव हा नेहमीच वेगळा आणि खास मानला जातो. घरोघरी बाप्पाचं स्वागत, पारंपरिक पूजा, आरती, भजन आणि गावातल्या वातावरणात रंगणारा उत्सव ही कोकणच्या गणपतीची खासियत. हीच झलक आता झी मराठीच्या 'सनई चौघडे' या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेतलं 'परब' कुटुंब यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी थेट गावी जाणार आहे. यानिमित्ताने मालिकेत कोकणातल्या पारंपरिक गणेशोत्सवाचे विविध पैलू दाखवले जाणार आहेत. हरतालिकेची पूजा, कार्यशाळेतून बाप्पाचं आगमन, चार मुलींच्या हस्ते होणारं स्वागत, गावातली आरती, डबल बारी भजन, गौरीचं आगमन आणि पारंपरिक पद्धतीने होणारं विसर्जन असे अनेक प्रसंग या खास ट्रॅकमध्ये दाखवले जातील.

मालिकेत शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चिन्मयी साळवी हिने शूटिंगचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, हा अनुभव तिच्यासाठी खूप खास होता. ती पहिल्यांदाच कणकवलीला गेली होती आणि तिला आपल्याच गावी आल्यासारखं वाटलं. तिचं मूळ गाव संगमेश्वर असल्याने तिथला दरवळ, शेणी-चुलीचा वास आणि गावातलं वातावरण तिला खूप जवळचं वाटलं, असं तिने सांगितलं.

शूटिंगचं काम खूप होतं, पण त्याचा ताण किंवा दगदग अजिबात जाणवली नाही, उलट गणपतीच्या सुट्टीला गावी आल्यासारखंच वाटलं, असं चिन्मयीने पुढे सांगितलं. संपूर्ण टीमने मस्ती-मजा करत हे शूटिंग एन्जॉय केलं. सध्या टीम परब कुटुंबाच्या गावच्या घरी मुक्कामी आहे. गणपतीसाठी सुट्टी घेऊन चाकरमानी जसे गावी जातात, तशाच पद्धतीने ही संपूर्ण टीम गावी गेल्याचं तिने नमूद केलं.

पुढे परब आणि खानोलकर कुटुंबात काय घडणार, याबाबतही चिन्मयीने थोडी माहिती दिली. या खास ट्रॅकमध्ये खानोलकर कुटुंबातले काही सदस्यही सहभागी होणार असल्याचं तिने सांगितलं, त्यामुळे मालिकेत पुढे रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात अधिक तपशील देण्यास तिने नकार दिला. खानोलकर कुटुंबातले काही सदस्य असल्याने पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतील असं सूचक विधान करत, याबद्दल जास्त सांगता येणार नाही पण हा ट्रॅक प्रेक्षकांना नक्की आवडेल, असं ती म्हणाली.

कोकणातलं शूटिंग करताना पावसामुळे अनेक अडचणी आल्याचंही चिन्मयीने सांगितलं. कोकणातला पाऊस कधीही सुरू होतो आणि कधीही थांबतो, त्यामुळे शूटिंगचं वेळापत्रक बऱ्याच अंशी हवामानावर अवलंबून होतं. टीमने मात्र चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं आणि पाऊस आल्यास सिक्वेन्स किंवा लोकेशन बदलून शूटिंग सांभाळलं जात होतं, असं तिने सांगितलं.

आउटडोअर शूट असल्यामुळे दिवसही मोठे असायचे, साधारण बारा ते पंधरा तास आणि कधीकधी त्याहूनही जास्त वेळ काम करावं लागत असे. पावसामुळे लोकेशनवर पोहोचण्यापासून कंटिन्युइटी सांभाळण्यापर्यंत अनेक अडचणी येत होत्या आणि अचानक पाऊस सुरू झाला की टेक थांबवावा लागत असे. मात्र संपूर्ण टीमच्या एकजुटीमुळे या सगळ्या अडचणी सहज पार पडल्याचं चिन्मयीने सांगितलं.

व्यस्त वेळापत्रकामुळे फिरण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही, पण कामाच्या मधल्या वेळेत कलाकारांनी खूप धमाल केली. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी बीचवर शूटिंग करताना तर संपूर्ण टीमने विशेष मजा केली. तिथलं जेवण खूप छान होतं आणि भजन-आरती व डबल बारीचा कार्यक्रमही ठेवला होता, ज्यात संपूर्ण युनिटने भरपूर एन्जॉय केलं. टीम अक्षरशः पहाटे पाच वाजेपर्यंत नाचली आणि दुसऱ्या दिवशी साडेआठचा कॉल टाइम असूनही सगळे पूर्ण एनर्जीत होते, असा गमतीशीर किस्सा चिन्मयीने सांगितला.

कोकणातलं निसर्गरम्य वातावरण, गावाकडची माणसं, पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव आणि त्यातला उत्साह यामुळे 'सनई चौघडे'मधला हा गणेशोत्सवाचा ट्रॅक खास ठरणार आहे. परब आणि खानोलकर कुटुंबाच्या गावच्या मुक्कामात नेमकं काय घडणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ