रशियाकडून भारताला वोरोनेझ-एम रडार यंत्रणेचा प्रस्ताव, ६,००० किमी पल्ल्याची क्षमता
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताला अत्याधुनिक वोरोनेझ-एम रडार प्रणाली देण्याचा प्रस्ताव दिला असून, त्यासाठी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे सुमारे ४ अब्ज डॉलर्सचा करार होण्याची शक्यता आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारत आणि रशियाच्या संरक्षण भागीदारीत एक नवा आणि महत्त्वाचा टप्पा येऊ घातला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला याआधी सुखोई-५७ (Su-57) स्टेल्थ फायटर जेट्स, एस-४०० (S-400) क्षेपणास्त्र यंत्रणा आणि अकुला-क्लास (Akula-class) अणु-पाणबुडी देण्याचा प्रस्ताव दिला होता. आता त्यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे रशियाच्या शस्त्रागारातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या 'वोरोनेझ-एम' (Voronezh-M) या धोरणात्मक पूर्वसूचना रडार प्रणालीची ऑफर.
संरक्षण वर्तुळात या रडार यंत्रणेला रशियन हवाई संरक्षणाचे 'ब्रह्मास्त्र' म्हटलं जातं. कारण या रडारमुळे शत्रूच्या कोणत्याही हालचाली हजारो किलोमीटर दूरवरूनच लक्षात येतात. रशियाच्या अल्माझ-अँटे (Almaz-Antey) या कंपनीने हे रडार विकसित केलं आहे. हे रडार कर्नाटकातील चित्रदुर्ग इथे बसवण्याच्या करारावर सध्या प्रगत पातळीवर चर्चा सुरू आहे. जर सुमारे ४ अब्ज डॉलर्सचा हा करार पूर्ण झाला, तर भारताला अंतराळातील आणि अवकाशातील धोक्यांची आधीच माहिती मिळवून देणारी एक मोठी ताकद मिळेल.
या रडार प्रणालीची खरी ताकद तिच्यात वापरलेल्या 'फेझ्ड-अरे' (Phased-Array) तंत्रज्ञानात आहे. आधीच्या पिढीतल्या 'ड्नेपर' (Dnepr) किंवा 'दार्याल' (Daryal) सारख्या रडार यंत्रणांना मोठ्या यांत्रिक उपकरणांची गरज लागत असे. पण वोरोनेझ प्रणाली इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सेकंदाच्या काही भागातच सगळ्या दिशांमध्ये आपली नजर फिरवू शकते. हे रडार आकाराने खूप कॉम्पॅक्ट आहे, वीज कमी वापरतं आणि कमी वेळात उभं करता येतं. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे ६,००० ते ८,००० किलोमीटरपर्यंतचा पल्ला. हे रडार एकाच वेळी शेकडो लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकतं, मग ते अंतराळातील उपग्रह असोत, उंचावरून येणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं असोत किंवा जमिनीलगत उडणारी क्रूझ क्षेपणास्त्रं असोत. भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक आणि विमानचालन तज्ज्ञ विजयेंद्र के. ठाकूर यांच्या विश्लेषणानुसार, ही रडार यंत्रणा कर्नाटकातील चित्रदुर्ग इथे बसवली तरी ती संपूर्ण पाकिस्तानचं हवाई क्षेत्र आणि चीनचा अर्ध्याहून जास्त भूभाग आपल्या टप्प्यात आणेल. चीन आणि पाकिस्तानकडून येऊ शकणाऱ्या बॅलिस्टिक किंवा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हल्ल्यांची पूर्वसूचना भारताला काही मिनिटं आधीच मिळेल. यामुळे भारताच्या एस-४०० आणि देशी 'अॅडव्हान्स एअर डिफेन्स' (AAD) यंत्रणांना शत्रूचं क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. याशिवाय अमेरिकेच्या 'पॅव्हे पॉझ' (PAVE PAWS) प्रणालीसारखी ही यंत्रणा हिंदी महासागरातील सागरी हालचालींवरही लक्ष ठेवण्यास मदत करेल.