गंगापूरमध्ये लाच घेताना पोलिस हेडकॉन्स्टेबल अडकला, त्याच रात्री उपनगराध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी
गंगापूर पोलिस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल शकील शेख याला एसीबीने लाच घेताना पकडले आणि त्याच रात्री त्याने उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांना पोलिस ठाण्याच्या आवारातच धमकावल्याचा आरोप झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गंगापूर पोलिस ठाण्यातील एका हेडकॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर काही तासांतच त्याने गंगापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शकील सत्तार शेख असे या हेडकॉन्स्टेबलचे नाव असून, अटक वॉरंटची कारवाई टाळण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात त्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर तीन हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्याला पकडले. या धमकी प्रकरणी शेखविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही तक्रार एका ३० वर्षीय मजुराने १० सप्टेंबर रोजी एसीबीकडे केली होती. तक्रारदाराच्या नावाने अटक वॉरंट निघाले होते आणि त्याविरुद्ध कारवाई न करता मदत करण्यासाठी शेखने पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद होते. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी खरी असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर तडजोड होऊन तीन हजार रुपये घेण्यास शेख तयार झाला. अटक झाल्याच्या त्याच रात्री पोलिस ठाण्याच्या आवारातच एका लोकप्रतिनिधीला धमकावल्याचा आरोप झाल्याने शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस ठाण्याच्या परिसरातच घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्था तसेच पोलिसांच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ (२) व ३५१ (३) अन्वये गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीच्या कारवाईनंतर काही वेळातच शकील शेखने नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप (वय ३५) यांना पोलिस ठाण्याच्या आवारातच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. जगताप यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, रात्री सुमारे ११ वाजता जगताप हे त्यांचे मित्र राहुल दुर्योधन वानखेडे यांच्यासोबत पटेल टी हाऊससमोर उभे होते. गणेश राजपूत यांनी स्वप्निल गणेश गायकवाड पोलिस ठाण्यात असल्याचे सांगितल्यावर जगताप व वानखेडे मोटारसायकलवरून पोलिस ठाण्याकडे गेले. रात्री सुमारे ११.२८ वाजता शकील शेख हा स्वप्निल गायकवाड व चार-पाच जणांसह पोलिस ठाण्याच्या मागील बाजूने समोर आला. तक्रारीनुसार, त्यावेळी शेखने जगताप यांच्याकडे पाहून, एवढ्या कारवाईने माझे काही वाकडे होत नाही, मी परत आल्यावर तुम्हाला संपवून टाकतो, तुमची औकात नाही, नंतर दाखवतो, अशी धमकी दिली. तसेच आईवरून शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
एसीबीचे पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे व पोलिस निरीक्षक राजू बी. नांगलोत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सिनकर आणि पोलिस हवालदार तोडकर यांनी हा सापळा रचला होता. गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता गंगापूर पोलिस ठाण्यातील एका कक्षात तक्रारदाराकडून अँथ्रासिन पावडर लावलेली तीन हजार रुपयांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना एसीबी पथकाने शकील शेखला रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेखच्या घराची झडती घेण्याची कारवाईही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.