SBI च्या अहवालाचा अंदाज: ऑक्टोबरमध्ये RBI कडून रेपो रेटमध्ये वाढीची शक्यता, EMI वर परिणाम होणार
कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी, SBI रिसर्चच्या अहवालानुसार पुढील दोन पतधोरण बैठकांमध्ये रेपो रेट वाढू शकतो
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
घर, गाडी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतलेल्या किंवा घेण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मासिक बजेटमध्ये EMI चा मोठा वाटा असतो, त्यामुळे व्याजदरात थोडासा जरी बदल झाला तरी त्याचा थेट परिणाम खिशावर होतो. याच पार्श्वभूमीवर SBI रिसर्चने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) रेपो रेट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
SBI रिसर्चच्या इकोव्रॅप अहवालानुसार, RBI ऑक्टोबर महिन्यात रेपो रेटमध्ये वाढ करू शकते आणि याचा फटका कर्जदारांना बसू शकतो. या अहवालामुळे आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, RBI नेमकी किती वाढ करणार?
अहवालात म्हटल्याप्रमाणे, ऑक्टोबरमध्ये रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने वाढण्याची शक्यता आहे. इथेच थांबणार नाही, तर डिसेंबर महिन्यातही आणखी २५ बेसिस पॉइंट्सची वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत एकूण मिळून रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची भर पडू शकते.
या संभाव्य वाढीमागचं एक कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ. मध्यपूर्वेतील तणाव वाढत असल्याने कच्च्या तेलाचे दर आता प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेले आहेत. जर हे दर असेच चढे राहिले, तर पुढील काळात महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. SBI रिसर्चच्या अंदाजानुसार, कच्च्या तेलाचे दर उच्च राहिले तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महागाई दर ६.५ टक्के किंवा त्याहूनही अधिक जाऊ शकतो.
आता प्रश्न असा आहे की, रेपो रेट खरंच वाढला तर सामान्य कर्जदारांवर काय परिणाम होईल? जर RBI ने ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढवला, तर त्यानंतर बँकाही आपल्या कर्जावरील व्याजदर वाढवू शकतात. ज्यांचं कर्ज फ्लोटिंग रेटवर आहे, त्यांच्या EMI मध्ये बदल दिसू शकतो, म्हणजे दरमहा आधीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागू शकते. मात्र EMI किती वाढेल हे शेवटी संबंधित बँकेने व्याजदरात केलेल्या बदलावर अवलंबून असेल.
अशा परिस्थितीत कर्जदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्या कर्जाचा सध्याचा व्याजदर तपासून घ्यावा आणि आपलं कर्ज फ्लोटिंग रेटवर आहे की नाही हे पाहावं. व्याजदर वाढल्यास EMI किती वाढू शकतो, याची माहिती आपल्या बँकेकडून आधीच घेऊन ठेवावी, जेणेकरून त्यानुसार मासिक बजेटचं नियोजन करता येईल. जे नवीन कर्ज घेण्याच्या विचारात आहेत, त्यांनीही निर्णय घेण्याआधी वेगवेगळ्या बँकांचे EMI आणि व्याजदर एकदा तपासून घ्यावेत, असा सल्ला दिला जात आहे.