पुण्यात पैशांच्या व्यवहारावरून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; टोळक्यातील चौघांना अटक
पैशांच्या व्यवहारावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी टोळक्यातील चौघांना अटक केली असून, उर्वरित दोन साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ७ ते ८ सप्टेंबर या दोन दिवसांच्या काळात जंगली महाराज रोड ते पिंपळे गुरव या भागात हा संपूर्ण प्रकार घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये गौरव रमेश कांबळे (वय ३०, राहणार गंजपेठ), समीर सुनील मेहता (वय ३८, राहणार शुक्रवार पेठ), रियान रफिक शेख (वय ५४, राहणार गंजपेठ) आणि संदीप निवृत्ती गावडे (वय ४५, राहणार गंजपेठ) यांचा समावेश आहे. या टोळक्याकडून अपहरण करून सुटका झालेल्या तरुणाचे नाव संदीप सिताराम मेंगडे (वय ३६, राहणार शिवणे, पुणे) असे असून, त्यांनी स्वतः डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची तक्रार दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप मेंगडे हे शिवणे भागात राहतात आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाशी त्यांचा पूर्वी आर्थिक व्यवहार झाला होता. याच जुन्या व्यवहारावरून वाद असल्याने ७ सप्टेंबर रोजी टोळक्याने संदीप यांना जंगली महाराज रोड भागात बोलावून घेतले आणि तिथेच त्यांना मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि गंजपेठ भागात नेण्यात आले. तिथे पुन्हा एकदा मारहाण करत त्यांच्याकडील दोन मोबाइल फोन, चांदीची चेन आणि पैशांचे पाकीट जबरदस्तीने काढून घेण्यात आले.
एवढे करूनही टोळक्याने संदीप यांना सोडले नाही. त्यांना पुन्हा जबरदस्तीने कारमध्ये बसवून यावेळी पिंपळे गुरव भागातील एका मित्राच्या घरी नेण्यात आले आणि तिथेही पुन्हा मारहाण करण्यात आली. याच ठिकाणी आरोपी गौरव कांबळे याने संदीप यांच्या दंडावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीदरम्यान संदीप ओरडू लागले, तेव्हा टोळक्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी माहिती या प्रकरणाच्या तपासातून समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी करत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या एका वेगळ्या घटनेत रेल्वे पटरीवर सतत गांजा ओढणाऱ्या काही तरुणांनी एका रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून रागाच्या भरात त्याचा गळा चाकूने चिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील एकाने पोलिसाच्या गळ्यावर वार केला, तर दुसऱ्याने त्याच्या छातीवर चाकूने वार केला आणि तिसऱ्याने त्याच्या डोक्यात दगड घातल्याचेही या घटनेत उघड झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून, यातील दोन आरोपी अल्पवयीन मुले असल्याचेही समोर आले आहे.