पोहे आणि गुळापासून घरच्याघरी मोदक, फक्त १० मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी
गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तळणीचे, उकडीचे किंवा खव्याचे मोदक नेहमीचेच झाले असतील, तर यंदा पोहे आणि गुळाचे मोदक करून बघा. कमी सामानात आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी.
गणपती बाप्पा घरी आले की एक वेगळीच उत्साहाची लाट येते आणि नैवेद्यासाठी मोदक हवाच असतो. बहुतेक घरांत तळणीचे, उकडीचे किंवा खव्याचे मोदक बनतात. पण यंदा जरा हटके पर्याय म्हणून पोहे आणि गुळापासून बनवलेले मऊसूत मोदक करून बघता येतील. ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि खायला तर एक नंबर लागते. खास बाब म्हणजे यासाठी फार सामान लागत नाही, आणि चव अशी की बाप्पाही खुश होतील. या मोदकांसाठी बाजारात जायची गरजच नाही, कारण लागणारं सगळं सामान घरातच सापडतं.
साहित्य म्हणून एक वाटी पोहे, एक वाटी दूध, पाऊण वाटी किसलेला गूळ, एक चमचा साजूक तूप, अर्धी वाटी सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड नारळ, थोडं मीठ, वेलची आणि जायफळ पूड, तसंच थोडे काजू-बदामाचे तुकडे आणि मोदकाचा साचा एवढं लागतं.
सगळ्यात आधी पोहे स्वच्छ करून घ्यायचे. त्यातला बारीक कचरा काढून दोन-तीन वेळा चाळून घ्यायचा, हवं असल्यास एकदा पाण्याने धुवूनही घेता येतं. एका कढईत एक वाटी दूध घेऊन त्यात हे पोहे टाकायचे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा, कारण गॅस मोठा असेल तर दूध लगेच खाली लागतं. दोन-तीन मिनिटं सतत हलवत राहायचं, म्हणजे पोहे दुधात मऊ होऊन सगळं दूध शोषून घेतात. थोडं झाकण ठेवलं तर ते अजून मऊ होतात. दूध पूर्ण आटलं की गॅस बंद करायचा.
पोहे थोडे गार झाले की मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्यात पाऊण वाटी किसलेला गूळ घालायचा. गूळ अख्खा न टाकता किसून टाकला की तो पटकन मिसळतो, गोडपणा हवा तसा कमी-जास्त करता येतो. हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवलं की एकदम मऊ आणि चिकट होतं. यात साखर मुळीच टाकायची नाही, कारण गुळामुळेच त्याला रंग आणि गोडवा येतो.
त्यानंतर पुन्हा कढई गॅसवर ठेवून त्यात एक चमचा तूप गरम करायचं आणि त्यात अर्धी वाटी नारळ टाकून फक्त दोन मिनिटं परतायचं, जास्त लाल होऊ द्यायचं नाही. डेसिकेटेड नारळ नसेल तर साधं सुकं खोबरं किसून किंवा ओला नारळ वापरला तरी चालतो. नारळ थोडा परतला की त्यात पोहे-गुळाचं मिश्रण घालून मंद गॅसवर चार-पाच मिनिटं सतत हलवत परतायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. हळूहळू हे मिश्रण घट्ट होऊन कढई सोडू लागतं. याच वेळी त्यात चिमूटभर मीठ घातलं की गोडपणा अजून खुलतो. मग वेलची पूड आणि किसलेलं जायफळ टाकायचं, ही जोडी गुळासोबत छान लागते. आवडत असल्यास काजू-बदामाचे काप घालता येतात.
मिश्रण थोडं गार झालं की हाताला आणि मोदकाच्या साच्याच्या आतल्या बाजूला थोडं तूप लावून घ्यायचं. मग थोडं थोडं मिश्रण साच्यात भरून दाबायचं, साचा उघडला की मस्त आकाराचा मोदक तयार होतो. साचा नसेल तर हातानेच छोटे लाडू वळले तरी चालतात. हे मोदक फ्रिजमध्ये दोन दिवस आरामात टिकतात, त्यामुळे अचानक पाहुणे आले किंवा नैवेद्यासाठी पटकन काही गोड हवं असेल तर ही रेसिपी उपयोगी पडते. खवा किंवा मावा न वापरता, कमी वेळात आणि कमी खर्चात तयार होणारे हे गूळ-पोह्याचे मोदक यंदा एकदा नक्की करून बघावेत.