पितळेची काळवंडलेली भांडी घरच्या घरी चकचकीत करण्याच्या सोप्या ट्रिक्स
हवा आणि ओलाव्यामुळे पितळेच्या भांड्यांवर जमणारा काळा थर लिंबू-मीठ, व्हिनेगर-बेकिंग सोडा किंवा चिंच-टोमॅटो वापरून सहज घालवता येतो.
घरातल्या पितळेच्या भांड्यांची आणि सजावटीच्या वस्तूंची शोभा त्यांच्या चकाकीमुळेच असते. पूजेतला पितळेचा दिवा असो, सणासुदीला बाहेर काढलं जाणारं पितळेचं ताट असो किंवा वर्षानुवर्षे जपून ठेवलेलं जुनं भांडं असो, या वस्तू फक्त घर सजवण्यापुरत्या नसतात, तर त्या आपल्या आठवणी आणि परंपरांशीही जोडलेल्या असतात. पण काळाच्या ओघात त्यांची चमक कमी होत जाते आणि पृष्ठभागावर काळा किंवा तपकिरी थर साचतो. अशावेळी अनेकजण थेट पॉलिश करण्याचा विचार करतात, पण प्रत्येक वेळी तेच गरजेचं असतं असं नाही.
पितळ हे मुळात तांबं आणि जस्त यांचं मिश्रण असतं. सतत हवा, ओलावा, पाणी किंवा काही ठराविक खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर त्याच्या पृष्ठभागावर हळूहळू एक थर तयार होतो. यालाच टार्निशिंग म्हणतात, आणि यामुळेच चकचकीत पितळ कालांतराने काळं, तपकिरी किंवा निस्तेज दिसू लागतं. यावर उपाय म्हणून घरातल्या रोजच्या वापरातल्या काही गोष्टीच उपयोगी पडतात.
हलका काळपटपणा घालवण्यासाठी लिंबू आणि मीठ हा सगळ्यात सोपा उपाय आहे. एक लिंबू अर्धं कापून त्याच्या कापलेल्या भागावर थोडं मीठ लावायचं आणि ते पितळेच्या पृष्ठभागावर हलक्या हाताने चोळायचं. लिंबातलं ॲसिड साचलेला थर सैल करायला मदत करतं, तर मीठ एखाद्या सौम्य स्क्रबरसारखं काम करतं. भांडी, ताट, पूजेचं साहित्य आणि इतर लहान वस्तूंसाठी ही पद्धत वापरता येते. स्वच्छ केल्यावर वस्तू पाण्याने धुवून पूर्णपणे कोरडी करायला हवी.
जर काळपटपणा जास्त असेल आणि नेहमीच्या साफसफाईने जात नसेल, तर पांढरा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घट्ट पेस्ट बनवावी. ही पेस्ट डाग असलेल्या भागावर लावून पाच ते दहा मिनिटं तशीच ठेवावी. त्यानंतर मऊ स्पंज किंवा कापडाने हलक्या हाताने घासून पाण्याने धुवावं. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे जास्त घासू नये, कारण त्यामुळे पृष्ठभागावर ओरखडे येऊ शकतात.
चिंच आणि टोमॅटोचाही वापर पितळ स्वच्छ करण्यासाठी करता येतो. काळवंडलेल्या भागावर चिंचेचा गर किंवा टोमॅटोचा रस लावून काही मिनिटं तसाच राहू द्यावा. यातलं नैसर्गिक ॲसिड काळपटपणा काढायला मदत करतं. थोड्या वेळाने वस्तू पाण्याने पूर्ण स्वच्छ धुवून कोरड्या, मऊ कापडाने पुसून घ्यावी.
पितळेच्या वस्तू पुन्हा पुन्हा काळवंडू नयेत यासाठी नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. वापरानंतर भांडी जास्त वेळ ओली ठेवू नयेत, सौम्य साबणाने स्वच्छ करून लगेच कोरडी करावीत. तीव्र डिटर्जंट किंवा खरखरीत स्क्रबर वापरणं टाळावं. या वस्तू ठेवायची जागाही कोरडी असावी. जास्त काळ वापरात नसलेल्या वस्तू मऊ कापडात गुंडाळून ठेवल्यास ओलावा आणि हवेशी थेट संपर्क कमी होण्यास मदत होते.