नव्या फ्रीलँडर 8 SUV ला जबरदस्त प्रतिसाद, 12 तासांत 5000 बुकिंग्स, 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी
चेरी जग्वार लँड रोव्हरची नवी एसयूव्ही फ्रीलँडर 8 लाँच होताच ग्राहकांच्या उड्या, अवघ्या 12 तासांत हजारो बुकिंग्स
प्रीमियम आणि लक्झरी गाड्यांसाठी ओळखली जाणारी कंपनी चेरी जग्वार लँड रोव्हर (Chery Jaguar Land Rover) हिने आपली नवी आणि बरेच दिवस चर्चेत असलेली एसयूव्ही फ्रीलँडर 8 (Freelander 8) बाजारात आणली आहे. या गाडीच्या लाँचिंगमुळे ऑटो विश्वात मोठी चर्चा सुरू झाली असून, ग्राहकांकडून हिला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे.
3 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे लाँच झालेली ही गाडी काही तासांतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. लाँच झाल्यानंतर अवघ्या 12 तासांत या गाडीला 5 हजारांहून जास्त ऑर्डर्स मिळाले. चीनमध्ये या गाडीची अधिकृत डिलिव्हरी येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या एसयूव्हीची किंमत साधारण 2,89,900 ते 3,79,900 युआन (अंदाजे 42,600 ते 55,900 अमेरिकी डॉलर) या दरम्यान ठेवण्यात आली आहे.
डिझाईनबाबत बोलायचं झालं तर फ्रीलँडर 8 चं डिझाईन ब्रँडच्या सिग्नेचर स्क्वेअर बॉक्स लूकवर आधारित असून ते 'कॉन्सेप्ट 97' या मॉडेलपासून प्रेरित आहे. गाडीच्या पुढच्या बाजूला क्लोज्ड-ऑफ डिझाईनसह रेक्टेंग्युलर हेडलाईट्स देण्यात आल्या आहेत. या एसयूव्हीची लांबी 5118 मिमी, रुंदी 2050 मिमी आणि उंची 1898 मिमी इतकी आहे, तर व्हीलबेस 3040 मिमी लांब आहे.
केबिनच्या बाबतीत सांगायचं तर आतील रचना अत्यंत आधुनिक आणि लक्झरी ठेवण्यात आली आहे. यात 46.3 इंचाचा मोठा पॅनोरामिक डिस्प्ले आणि 15.6 इंचाची एलईडी सेंट्रल कंट्रोल स्क्रीन मिळते. प्रवाशांच्या आरामासाठी ड्युअल झिरो-ग्रॅव्हिटी सीट्स, फोल्डिंग टेबल आणि ऑनबोर्ड रेफ्रिजरेटरची सोय देण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ही एसयूव्ही बरीच पुढारलेली आहे. यात रूफ-माउंटेड LiDAR सेन्सर देण्यात आला असून, ती हुवावे कियानकून एडीएस 5.0 (Huawei Qiankun ADS 5.0) या इंटेलिजेंट ड्रायव्हिंग सिस्टमने सुसज्ज आहे. यासाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8397 हा चिप वापरण्यात आला आहे. तसेच हुवावेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली i-ATS इंटेलिजेंट ऑल-टेरेन सिस्टम 20 वेगवेगळ्या टेरेन मोड्सना सपोर्ट करते.
फ्रीलँडर 8 मध्ये 60.3 किलोवॅट-तास क्षमतेचा CATL Freevoy बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. यातलं 1.5 लिटरचं टर्बोचार्ज्ड 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन रेंज एक्स्टेंडर म्हणून काम करतं, तर दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळून 818 बीएचपी आणि 813 एनएम टॉर्क तयार करतात. फक्त मागची इलेक्ट्रिक मोटर 335 बीएचपीपर्यंत पॉवर तयार करते आणि ती टू-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेली आहे.
कंपनीचा दावा आहे की या एसयूव्हीची इलेक्ट्रिक रेंज 310 किमी (सीएलटीसी) पर्यंत आहे. यात 800 व्होल्टचं इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर असून ते 6 सी चार्जिंगला सपोर्ट करतं. फास्ट चार्जरचा वापर केल्यास बॅटरी 20 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात, असंही कंपनीने सांगितलं आहे.