मॅट्रिमोनी साईटवर मेजर बनून महिला ऑडिटरची 22 लाखांची फसवणूक
नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या महिला लेखापरीक्षकाला बनावट आर्मी मेजरने गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.
लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या प्रधान महालेखाकार कार्यालयातील एका वरिष्ठ महिला लेखापरीक्षकाला बनावट आर्मी मेजर बनून फसवल्याची खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकरणात आरोपीने डिफेन्स मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून महिलेशी ओळख वाढवली आणि स्वतःला भारतीय लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचा मेजर असल्याचं भासवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवत ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली आरोपीने महिलेकडून 22 लाख 6 हजार 200 रुपये उकळले. पैसे हातात येताच आरोपीने महिलेशी बोलणं बंद करून टाकलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्रनगर येथे राहणाऱ्या नेहा शशी सिंह (41) या प्रधान महालेखाकार ऑडिट-2 कार्यालयात वरिष्ठ लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2018 साली त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर जुलै 2022 मध्ये जोडीदाराच्या शोधात त्यांनी डिफेन्स मॅट्रिमोनी वेबसाईटवर स्वतःचं प्रोफाईल तयार केलं होतं.
याच काळात त्यांची ओळख हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील घुमारवीं तहसीलच्या हटवार गावात राहणाऱ्या मनदीप सुनील शर्मा (32) याच्याशी झाली. आरोपीने आपल्या मॅट्रिमोनी प्रोफाईलवर स्वतःला लष्करातील मेजर असल्याचं दाखवलं होतं. बोलण्याच्या ओघात त्याने महिलेला सांगितलं की तो जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. एवढंच नाही तर त्याने लष्कराच्या गणवेशातले स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा महिलेला पाठवले, त्यामुळे तिचा विश्वास आणखी पक्का झाला.
ओळख वाढल्यानंतर आरोपीने महिलेशी लवकरात लवकर लग्न करण्याबाबत बोलणं सुरू केलं. फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न करण्याचं आश्वासनही त्याने दिलं होतं. याच दरम्यान त्याने लष्करातील नोकरी सोडून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करण्याची योजना महिलेसमोर मांडली आणि व्यवसायासाठी आर्थिक मदत मागितली.
आरोपीच्या बोलण्यावर आणि लग्नाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने त्याला पैसे देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने ऑफिस सोसायटी आणि बँकेकडून कर्जही घेतलं. त्यानंतर वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये नेट बँकिंग आणि फोन-पेच्या माध्यमातून आरोपी आणि त्याच्या चुलत भावाच्या बँक खात्यात एकूण 22 लाख 6 हजार 200 रुपये ट्रान्सफर केले.
पैसे मिळाल्यानंतर आरोपीच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो महिलेशी बोलण्यास टाळाटाळ करू लागला. पीडित महिलेने आपले पैसे परत मागितले तेव्हा आरोपीने फक्त 50 हजार रुपये परत केले. त्यानंतर त्याने फोनही उचलणं बंद केलं.
सतत संपर्क करूनही आरोपीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी आरोपी मनदीप सुनील शर्मा याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 170, 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीने खरोखर लष्करात नोकरी केली होती का, मॅट्रिमोनी प्रोफाईलवर दिलेली माहिती किती खरी होती आणि महिलेकडून मिळालेल्या पैशांचा वापर कुठे करण्यात आला, या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.