गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:21 IST

पापा जाधव हत्याकांड: राजुरा पोलिसांची पाच आरोपींवर मोक्का कारवाई

भरदिवसा गोळीबार करून झालेल्या हत्येनंतर राजुरा पोलीस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोक्का कायद्याचा वापर.

पापा जाधव हत्याकांड: राजुरा पोलिसांची पाच आरोपींवर मोक्का कारवाई छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भरदिवसा झालेल्या एका हत्याकांडाने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील पाच आरोपींवर पोलिसांनी आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. राजुरा पोलीस ठाण्याच्या इतिहासातील ही पहिलीच मोक्का कारवाई ठरली आहे.

२४ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सोमनाथपूर वार्डातील रहिवासी विनोद ऊर्फ पापा जनार्धन जाधव हे राजुरा कोर्टासमोरील किरणकुमार साईला यांच्या नारळ पाण्याच्या दुकानाजवळ काही मित्रांसोबत बसले होते. त्याचवेळी इंदिरानगर, राजुरा येथील करण दुर्गराज मेकलवार आणि करण दीपक बावीस्कर हे दोघे तोंडाला दुपट्टा बांधून बाईकवरून तिथे आले. कोणताही वेळ न दवडता करण दीपक बावीस्कर याने आपल्याजवळील पिस्तुलातून पापा जाधव यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जागीच खून केला. या घटनेनंतर शहरात प्रचंड दहशत पसरली होती. राजुरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), ३(५) आणि भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राजुराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने पुढे नेला. या तपासात केवळ प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींनाच नाही, तर हत्येचा कट रचणाऱ्या, आरोपींना चिथावणी देणाऱ्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या परवेज सरवर शेख, कार्तिक उमेश खामनकर आणि सौरभ ऊर्फ भुर्जी उमेश खामनकर या साथीदारांनाही अटक करण्यात आली. या आरोपींकडून कारवाईदरम्यान ३ पिस्तुले, ३ रिकाम्या मॅग्झिन आणि ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलिसांच्या रेकॉर्डवर त्यांच्याविरुद्ध याआधीही अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. या टोळीचे संघटित गुन्हेगारी जाळे मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ ची कलमे लावण्यास मंजुरी दिली.

ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे आणि पोलीस हवालदार कैलास आलाम यांनी यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ