पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे रासायनिक लेपन 23 ते 25 सप्टेंबरला, दर्शनाच्या वेळेत बदल
कोर्टातील याचिकेमुळे तीन महिने रखडलेल्या लेपन कामाला मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने परवानगी दिल्यानंतर आता तारीख निश्चित झाली आहे.
पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मूर्तींवरच्या रासायनिक लेपन प्रक्रियेची तारीख अखेर निश्चित झाली असून, 23 ते 25 सप्टेंबर या तीन दिवसांत भारतीय पुरातत्त्व विभाग (ASI) हे काम पूर्ण करणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी ही माहिती दिली.
हे काम गेले तीन महिने रखडलेले होते. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींची सतत झीज होत असल्यामुळे मंदिर समिती आणि भाविक दोघांचीही चिंता वाढली होती, त्यामुळे लेपनाचा निर्णय झाला होता. मात्र या रासायनिक लेपनाच्या विरोधात काही भाविकांनी कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे काम तीन महिने पुढे ढकलले गेले. अखेर मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे 22 सप्टेंबरला शेजारती पूर्ण झाल्याबरोबर पुरातत्त्व विभाग लगेच कामाला सुरुवात करणार आहे.
पंढरपुरात दरवर्षी साधारण 2.5 ते 3 कोटी भाविक विठुरायाच्या चरणांवर मस्तक टेकवून आणि स्पर्श करून दर्शन घेतात. इतक्या मोठ्या संख्येने होणारा स्पर्श, नियमित अभिषेक, तसेच हवामानातले बदल आणि आर्द्रता यामुळे मूर्तीच्या दगडाची मोठी झीज होते. सध्या विठ्ठलमूर्तीच्या पायावर खड्डा पडला असून पाय पूर्णपणे झिजले आहेत. मूर्तीच्या इतरही काही भागांना तातडीने लेपनाची गरज निर्माण झाली आहे. दगडाची झीज थांबवणे, पडलेले तडे भरून काढणे आणि मूर्तीचं दीर्घकाळ संरक्षण करणे यासाठी हे लेपन गरजेचं आहे.
मंदिर प्रशासनाकडे कारभार आल्यानंतर सर्वात आधी 1988 साली मूर्तीवर लेपन करण्यात आलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या वेळी आतापर्यंत चार वेळा विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर हे लेपन करावं लागलं आहे. परंपरेत या प्रक्रियेला 'वज्रलेप' म्हणतात, पण सध्या पुरातत्त्व विभाग अत्याधुनिक आणि मान्यताप्राप्त रासायनिक संरक्षक लेप वापरतो.
भारतीय पुरातत्त्व विभागाचे निवृत्त उपसंचालक आणि रसायनतज्ज्ञ विलास पुनीराज यांच्या माहितीनुसार, या लेपात मुख्यतः इपॉक्सी राळ, दगडाची भुकटी आणि पाणी न झिरपणारे सिलिकॉनआधारित पदार्थ वापरले जातात. पुरातत्त्व विभाग देशभरात जी मान्यताप्राप्त पद्धत वापरतो, तीच पद्धत इथेही वापरली जाणार आहे. हे रसायन पूर्णपणे हर्बल म्हणजे नैसर्गिक आणि अधिकृत असल्यामुळे मूर्तीला कुठलीही हानी पोहोचत नाही.
हे लेपन किती काळ टिकतं, हे भाविकांचा स्पर्श, नियमित अभिषेक आणि वातावरणातल्या बदलांवर अवलंबून असतं. आधीच्या अनुभवावरून पंढरपुरात हे संरक्षणात्मक लेपन साधारण 5 ते 6 वर्षं व्यवस्थित टिकतं. त्यानंतर मूर्तीची पुन्हा झीज झाली की नव्याने लेपन प्रक्रिया करावी लागते.
22 सप्टेंबरच्या शेजारतीनंतर लगेच काम सुरू होऊन 23 ते 25 सप्टेंबर या तीन दिवसांत लेपन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या दिवसांत दर्शनाच्या वेळेत बदल असणार आहे, त्यामुळे भाविकांनी पंढरपूर वारीचं नियोजन करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी.