नंदापूरला भारत माता मंदिराचा लोकार्पण सोहळा २८ सप्टेंबरला, भैय्याजी जोशी यांच्या हस्ते
समृद्धी महामार्गालगत नंदापूर येथे उभारण्यात येत असलेल्या श्री भारत माता मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
देऊळगाव राजा परिसरातील नंदापूर येथे समृद्धी महामार्गालगत श्री भारत माता मंदिराची भव्य वास्तू उभी राहत असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. प.पू. सद्गुरू ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या 'राष्ट्रप्रथम' या संकल्पनेतून हे मंदिर साकारले जात आहे. पहिल्या टप्प्यात भारतमातेच्या मूर्तीची स्थापना आणि लोकार्पण होणार असून, या सोहळ्याला सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन भारत माता मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी केले आहे.
हा लोकार्पण सोहळा सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक घनश्याम शेठ गोयल राहणार आहेत.
या मंदिराची एकूण उंची १०० फुटांपेक्षा जास्त असणार आहे. मंदिर परिसरात जवळपास ४ हजार चौरस फुटांचा मोठा हॉल बांधण्यात आला असून, त्यात ५ फूट उंचीची भारतमातेची भव्य मूर्ती बसवण्यात येत आहे. हीच मूर्ती पहिल्या टप्प्यात स्थापन करून तिचे लोकार्पण केले जाणार आहे.
या भव्य हॉलमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील वेगवेगळ्या घटनांचे चित्र प्रदर्शन आणि एक ग्रंथालयही उभारले जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची, त्यातील क्रांतिकारकांची आणि हुतात्म्यांनी दिलेल्या त्यागाची ओळख पुढच्या पिढीला व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
मंदिराच्या बांधकामातही भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचे वेगवेगळे पैलू दाखवले जाणार आहेत. यात लाल किल्ल्याची प्रतिकृती, कोणार्क मंदिराचे चक्र, अजिंठा लेणीची कमान, तसेच दक्षिण आणि उत्तर भारतीय बांधकाम शैलीची वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
आपल्या शास्त्रांनी राष्ट्रमाता, गोमाता आणि गंगामाता यांना मातृत्वाचा दर्जा दिला आहे, असे मंदिराच्या संकल्पनेमागे मांडण्यात आले आहे. समता आणि समरसतेच्या संस्कारांवर आधारलेल्या भारतमातेच्या वैभवाचे दर्शन या प्रकल्पातून व्हावे, अशी यामागची भावना आहे.
स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वाचा त्याग करून आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या चरणी वाहणाऱ्या क्रांतिकारी हुतात्म्यांची ओळख तरुण पिढीला व्हावी, आणि त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेत तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत राहावी, या भावनेतून हा भारत माता मंदिर प्रकल्प उभारला जात आहे.
'राष्ट्रभक्ती हीच ईश्वरभक्ती' हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजावा आणि भारतमातेच्या चरणी सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी, या हेतूने हा प्रकल्प उभा राहत आहे. या राष्ट्रकार्यात प्रत्येकाने आपापल्या परीने सहभागी व्हावे आणि हे काम जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भारत माता मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी पुन्हा एकदा केले आहे.