नागपूरच्या मारबत मिरवणुकीत यंदा MPSC च्या भोंगळ कारभारावर बडग्यातून टीका
तान्हा पोळ्याला निघणाऱ्या नागपूरच्या ऐतिहासिक मारबत मिरवणुकीत यंदा MPSC च्या भ्रष्ट कारभाराविरोधात खास बडगा तयार करण्यात आला आहे.
विदर्भाच्या लोकपरंपरेत मारबत उत्सवाला खूप वेगळं स्थान आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण म्हणजे लोकपरंपरा, समाजाला संदेश देणं आणि वाईट रूढींविरोधात जागृती करणं याचं एक अनोखं मिश्रण आहे. नागपूर शहरातल्या मारबत मिरवणुकीला तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही खूप महत्त्व आहे. हा उत्सव फक्त धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नाही, तर वाईट प्रवृत्ती, रोगराई, अंधश्रद्धा, अन्याय आणि समाजातल्या इतर समस्यांविरोधात लोकांमध्ये जागृती करणारी परंपरा म्हणून ओळखली जाते. बैलपोळ्यानंतर येणाऱ्या तान्हा पोळ्याच्या दिवशी हा सण साजरा होतो.
मारबत म्हणजे मोठ्या आकाराची प्रतीकात्मक मूर्ती किंवा पुतळा. नागपुरात प्रामुख्याने काळी मारबत आणि पिवळी मारबत अशा दोन मारबतींची परंपरा चालत आलीय. तान्हा पोळ्याच्या दिवशी या दोन्ही मारबतींची मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत "घेऊन जा गे मारबत", "ईडा-पिडा घेऊन जा" अशा घोषणा दिल्या जातात. यामागची भावना अशी, की समाजावरची संकटं, रोगराई आणि वाईट प्रवृत्ती मारबतीसोबत दूर जाव्यात. नागपुरात ही परंपरा 145 वर्षांहून जास्त काळ जपली जात असल्याचं सांगितलं जातं.
काळ्या मारबतीचा संबंध ब्रिटिशकालीन नागपूरशी जोडला जातो. भोसले घराण्यातल्या बाकाबाईंनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्याच्या निषेधातून काळी मारबत काढण्याची परंपरा सुरू झाली, असं सांगितलं जातं. त्यामुळे ती अन्याय, दुष्ट प्रवृत्ती आणि जुलमाविरोधातलं प्रतीक मानली जाते. ही परंपरा साधारण 1880-1881 च्या सुमारास सुरू झाल्याचं ऐतिहासिक संदर्भ सांगतात. पिवळ्या मारबतीची परंपरा 1885 मध्ये जागनाथ बुधवारी भागातल्या तऱ्हाणे तेली समाजाने सुरू केली. पिवळी मारबत देवीचं किंवा लोकांचं रक्षण करणाऱ्या शक्तीचं प्रतीक मानली जाते, त्यामुळे तिच्या दर्शनासाठी महिला आणि लहान मुलांची मोठी गर्दी होते.
मारबत मिरवणुकीतलं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे बडगे. कागद, बांबू आणि गवतापासून तयार केलेले हे पुतळे वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका करण्यासाठी वापरले जातात. दरवर्षी समाजापुढे जे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्न असतात, त्यावर बडग्यांच्या माध्यमातून टीका केली जाते आणि समाजाचं मत मांडलं जातं. मिरवणूक शहरातून फिरवल्यानंतर मारबत आणि बडगे जाळले जातात. वाईट शक्ती, वाईट रूढी, रोगराई आणि नकारात्मकता जाळून टाकणं आणि चांगल्या विचारांचं स्वागत करणं, असा यामागचा संदेश आहे.
यंदा राज्यभरातल्या तरुणांमध्ये MPSC च्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारामुळे नाराजी आहे, आणि विविध शहरांत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी MPSC विरोधात मोर्चेही काढलेत. याचा प्रतिबिंब नागपूरच्या मारबत मिरवणुकीतही दिसणार आहे. नागपूरच्या बिनाकी मंगळवारी भागातल्या पोळा मैदानाजवळच्या तरुणांनी MPSC च्या भ्रष्ट कारभाराची खिल्ली उडवणारा खास बडगा तयार केलाय, आणि तो यंदाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहे. सामान्य कुटुंबातले तरुण मोठ्या मेहनतीने MPSC सारख्या परीक्षेची तयारी करतात, पण पेपरफुटीमुळे त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या MPSC च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना "घेऊन जा गे मारबत" अशी घोषणा देत हा बडगा मारबत मिरवणुकीत दिसणार आहे.