मुंब्य्रातील १९ वर्षीय तरुणी एटीएसच्या रडारवर, बनावट पासपोर्टप्रकरणी गुन्हा दाखल
पासपोर्ट मिळवताना जुन्या पासपोर्टची माहिती लपवल्याचा आरोप असलेल्या नमीरा तारिक खान हिच्या वडिलांचा संबंध थेट इंडियन मुजाहिदीन आणि सिमीशी असल्याचे तपासात समोर आले आहे.
मुंब्रा भागात राहणाऱ्या १९ वर्षांच्या नमीरा तारिक खान हिच्यावर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने नजर ठेवली आहे. या तरुणीच्या पासपोर्टसंदर्भातील एका प्रकरणामुळे ती तपास यंत्रणेच्या जाळ्यात अडकली आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिचे वडील तारिक खान हे इंडियन मुजाहिदीन म्हणजेच आयएम आणि सिमी या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित प्रकरणांमध्ये सामील असल्याचेही तपासातून पुढे आले आहे.
एटीएसने केलेल्या सुरुवातीच्या चौकशीनंतर मुंब्रा पोलिसांनी नमीरा तारिक खान हिच्याविरोधात पासपोर्ट कायद्याच्या कलम १२(१)(ब) अंतर्गत आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३१८(२), २१२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तिचा जुना आणि नवा पासपोर्ट, तिने केलेला परदेश प्रवास आणि फरार असलेल्या वडिलांशी असणारे संभाव्य दुवे जोडण्याचे काम सध्या तपास यंत्रणा करत आहेत.
तपासात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंब्य्रात राहणाऱ्या नमीराने अपूर्ण माहिती देऊन नवीन पासपोर्ट मिळवल्याचे एटीएसच्या निदर्शनास आले. तिच्याकडे उत्तर प्रदेशातील लखनौहून आधीच जारी झालेला एक पासपोर्ट होता. नवीन पासपोर्ट काढताना जुन्या पासपोर्टचा तपशील देणे बंधनकारक असते, मात्र नमीराने हा तपशील न देताच मुंब्य्रातून नवा पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. हे उघड झाल्यानंतर एटीएसने तिच्या जुन्या पासपोर्टची तसेच परदेश दौऱ्यांची माहिती खंगाळण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान नमीराचे वडील तारिक खान यांचे नाव इंडियन मुजाहिदीन आणि सिमीशी जोडलेल्या प्रकरणांमध्ये आढळले, त्यामुळे एटीएसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. तारिक खान यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पहिला गुन्हा २००१ सालचा असून त्यात बंदी घातलेल्या सिमी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप होता. २००६ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा म्हणजेच युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर २०११ मध्ये बनावट चलनाशी संबंधित आणखी एक गुन्हा त्यांच्यावर नोंदवला गेला, यातही युएपीएची कठोर कलमे लावण्यात आली होती.
२०११ नंतर तारिक खान देशातून फरार असल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. तो एखाद्या आखाती देशात लपून राहिला असावा असे मानले जाते. नमीरा अल्पवयीन असताना तिच्याकडे लखनौहून जारी झालेला हाच पासपोर्ट होता, आणि त्याच पासपोर्टवर तिने २०१४ आणि २०१६ साली आखाती देशांमध्ये प्रवास केला होता. याच प्रवासादरम्यान तिने फरार वडिलांची भेट घेतली असावी, असा संशय तपास यंत्रणांना आहे. मात्र याबाबतचा तपास अद्याप सुरू असून तिच्या परदेश प्रवासाच्या नोंदी आणि इतर तपशील पडताळले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नमीराच्या नव्या पासपोर्टबाबतची माहिती उघड झाल्यावर आणि एटीएसने तपासाचा वेग वाढवल्यावर तिची आई शबानाही बेपत्ता झाली आहे. सध्या एटीएस नमीरा, तिची आई शबाना आणि फरार वडील तारिक खान यांच्यातील संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. जुन्या पासपोर्टची माहिती आणि परदेश प्रवासाचा उद्देश लपवून नमीराने नवीन पासपोर्ट का मिळवला, याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.