मुंबईत UWA चा भारतातील पहिला कॅम्पस सुरू; फडणवीसांकडून जागतिक शिक्षण भागीदारीचे स्वागत
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक यांची उपस्थिती
मुंबईत युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया म्हणजेच यूडब्ल्यूए इंडियाच्या कॅम्पसचे उद्घाटन झाले असून, मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना यामुळे नवी बळकटी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि गुणवंत मनुष्यबळाच्या जोरावर भविष्यातील उद्योग आणि संशोधन परिसंस्था उभी करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऑस्ट्रेलियातील आघाडीचे संशोधनाधारित विद्यापीठ असलेल्या यूडब्ल्यूएने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत उभारण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित 'ग्रुप ऑफ एट' या गटातील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. आजच्या मुंबईची क्षमता आणि जागतिक पातळीवर वाढते महत्त्व हा निर्णय अधोरेखित करतो, असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि करमणुकीची राजधानी असली तरी पुढच्या पिढीसाठी तिला जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनवण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी मुंबईजवळ उभ्या राहत असलेल्या 'मुंबई ३.०' प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इकोसिस्टम तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले असून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यासाठी नवी दारे उघडली आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आधी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे लागत असे; आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे त्यांनी सांगितले. यूडब्ल्यूएच्या मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण मिळेलच, शिवाय देशातील मोठ्या वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांत संयुक्त संशोधन आणि शैक्षणिक सहकार्य वाढावे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे उत्तम क्षमता आहे आणि महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात प्रतिभा व संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील ज्ञानाधारित भागीदारी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा एक भक्कम आधारस्तंभ ठरू शकते, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यूडब्ल्यूए हे महाराष्ट्राच्या विकासप्रवासातील भागीदार बनले असून, या भागीदारीच्या वाढीसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक यांनी मुंबईतील यूडब्ल्यूए कॅम्पसचे उद्घाटन हा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि भारत, विशेषतः महाराष्ट्र यांच्यातील संबंधांमधील ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. गेल्या ३० वर्षांपासून मुंबई ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील सहभागाचे प्रमुख केंद्र राहिली असून शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि लोकसंपर्क या क्षेत्रांत दोन्ही बाजूंत भक्कम भागीदारी तयार झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. मुंबई कॅम्पसमुळे विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी मिळतील आणि भारत-वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम व कौशल्य विकास सहकार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास कूक यांनी व्यक्त केला.
चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर यांनी सांगितले की, मुंबई आणि चेन्नई येथील कॅम्पससाठी सुमारे ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली असून, भारत-ऑस्ट्रेलिया संबंध अधिक मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे. उच्च शिक्षणातून ज्ञान, संधी आणि जागतिक पातळीवरील संलग्नता निर्माण करण्याच्या उद्देशाने यूडब्ल्यूए भारतातील नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूडब्ल्यूएच्या मुंबई कॅम्पससाठी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. विद्यापीठाने तीन भारतीय विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केल्याचे स्वागत करत, यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणासाठी लागणाऱ्या परकीय चलनाचा खर्च वाचेल आणि विद्यापीठाच्या संशोधनकेंद्री कामामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांचे कॅम्पस 'एज्युकेशन सिटी'मध्ये उभे राहत असून, भविष्यात तिथे सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.