नयनताराचा 'मुकुथी अम्मान २' टीझर आला; महाकालीच्या रूपात 'रामायणम्'ला देणार टक्कर
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या 'मुकुथी अम्मान २ - राइज ऑफ महाशक्ती' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीत हा चित्रपट रणबीर कपूरच्या 'रामायणम्'सोबत बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा यंदा देवी महाशक्तीच्या दिव्य आणि रौद्र रूपात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. २०२० साली आलेल्या सुपरहिट तमिळ चित्रपट 'मुकुथी अम्मान'चा हा सिक्वेल असून, 'मुकुथी अम्मान २ - राइज ऑफ महाशक्ती' असं त्याचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अडीच मिनिटांच्या या टीझरमध्ये पौराणिक कथा, भक्ती आणि अॅक्शन याचा जबरदस्त मेळ पाहायला मिळतो.
'राइज ऑफ महाशक्ती' नावाने आलेल्या या टीझरची सुरुवात एका प्राचीन काळातल्या गावापासून होते. गावात अशांतता पसरलेली दिसते आणि एका तरुण राजकुमाराच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो. शत्रू राजकुमाराला ठार मारण्यासाठी गावाकडे कूच करत असल्याचं टीझरमध्ये दाखवलं आहे. आपल्या मुलाचा जीव वाचावा म्हणून एक आई देवी मुकुथी अम्मान म्हणजेच महाकालीच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना करते. मुलाला वाचवण्यासाठी ती स्वतःच्या जीवाची आहुती द्यायलाही तयार होते.
पुढच्याच क्षणी टीझरमध्ये एक धक्कादायक वळण येतं. मुलाचा जीव वाचावा म्हणून ती आई स्वतःचं आयुष्य देवीला अर्पण करते आणि तिथून कथा एका मोठ्या युद्धाकडे वळते. टीझरच्या शेवटच्या काही सेकंदांत नयनताराचा महाकालीच्या रूपातला दिव्य आणि रौद्र अवतार पडद्यावर उलगडतो. आईच्या भक्तीमुळे आणि त्यागामुळे देवीचा हा अवतार प्रकट होतो आणि कुटुंबाला धोका पोहोचवणाऱ्या शक्तींविरुद्ध ती उभी राहते. या दृश्यांमधली भव्यता आणि अॅक्शन यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जात आहे. रणांगण, राजसिंहासन, घोडदळ आणि मोठ्या युद्धाची दृश्येही टीझरमध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे चांगल्या आणि वाईट शक्तींमधला मोठा संघर्ष चित्रपटात दिसणार असल्याचे संकेत मिळतात.
२०२० सालचा 'मुकुथी अम्मान' हा देवी आणि सामान्य माणसांमधल्या नात्यावर आधारित कॉमेडी-ड्रामा होता. पण सिक्वेलमध्ये निर्मात्यांनी भक्तीसोबतच अॅक्शन आणि पौराणिक कथेचा भव्य मेळ घातला आहे. दिग्दर्शक सुंदर सी. यांनी या फ्रँचायझीला यावेळी मोठ्या व्यावसायिक चित्रपटाचं रूप दिल्याचं टीझरवरून स्पष्ट दिसतं.
टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. 'मुकुथी अम्मान २ - राइज ऑफ महाशक्ती' हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट जगभर प्रदर्शित केला जाणार आहे. याच दिवशी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायणम्'शी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सरळ टक्कर होणार आहे. त्यामुळे दोन मोठ्या पौराणिक आणि भक्तीप्रधान चित्रपटांमधला हा सामना प्रेक्षकांसाठी आणि बॉक्स ऑफिससाठी खास ठरणार आहे.