MPSC ची मोठी अपडेट! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आता 'या' दिवशी होणार, नवीन वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून आता ती थेट 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) महत्त्वाची अपडेट दिली आहे. आयोगामार्फत घेतली जाणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलीय. याबाबतचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक आयोगानं आपल्या संकेतस्थळावर जारी केलं आहे.
याआधी 16 जुलै 2026 रोजी आयोगानं एक शुद्धीपत्रक काढलं होतं. त्या शुद्धीपत्रकात आयोगानं सांगितलं होतं की ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी नेहमीप्रमाणे प्रचलित पद्धतीनं, म्हणजे ऑफलाइन OMR पद्धतीनं घेतली जाणार आहे. पण आता या तारखेत मोठा बदल करण्यात आलाय. 25 ऑक्टोबर 2026 ऐवजी ही परीक्षा आता थेट 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातल्या सगळ्या जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
परीक्षा का पुढे ढकलली, याचं कारण देताना आयोगानं म्हटलंय की परीक्षेच्या नियोजनाशी संबंधित वेगवेगळ्या प्रशासकीय गोष्टींचा सगळ्या बाजूंनी विचार करून हा निर्णय घेतला गेलाय. यात प्रामुख्याने राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा उपकेंद्रं उपलब्ध असणं आणि तिथली स्थानिक परिस्थिती, वाहतुकीची व्यवस्था, परीक्षार्थींना वेळेत आणि सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांवर पोहोचता येणं, तसंच काही जिल्ह्यांतल्या परीक्षा आयोजनाबाबत तिथल्या जिल्हा प्रशासनांकडून आलेले अहवाल ही कारणं सांगितली आहेत.
याशिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, पुढे येणारा सणासुदीचा काळ, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचं वेळापत्रक आणि हिवाळी अधिवेशन या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती MPSC कडून देण्यात आलीय. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी येऊ नयेत आणि परीक्षेचं नियोजन विस्कळीत होऊ नये, यासाठी ही तारीख निश्चित करण्यात आल्याचं आयोगानं सांगितलंय.
परीक्षा शांततेत, सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडावी, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. परीक्षेचं केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ, केंद्रनिहाय आवश्यक सूचना आणि इतर सगळे तपशील MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर योग्य वेळी जाहीर केले जातील, असंही आयोगानं नमूद केलंय. त्यामुळे उमेदवारांनी या तपशीलांसाठी वेळोवेळी संकेतस्थळ तपासावं.
त्यामुळे सगळ्या उमेदवारांनी परीक्षेच्या बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी आणि नियमित अपडेट्ससाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन उप सचिव विवेक देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.