महिन्याला दीड-दोन लाख कमावल्यावर थांबा? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर वाद
जास्त पगाराच्या मागे धावणे हा एक ट्रॅप असल्याचं एका एमबीए ग्रॅज्युएटने इन्स्टाग्रामवरील रीलमध्ये सांगितलं आहे.
पगार जितका जास्त तितकं आयुष्य चांगलं, असं आजकाल बहुतेक तरुण वर्किंग प्रोफेशनल्सना वाटतं. जास्तीत जास्त कमाई करणं हेच त्यांचं मुख्य ध्येय बनलेलं असतं. पण एका एमबीए प्रोफेशनलने याच विचारावर बोट ठेवलं आहे. जास्त कमाई करण्यासाठी जी किंमत मोजावी लागते, ती त्यातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त होऊ शकते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
इन्स्टाग्रामवर एक रील सध्या व्हायरल होत आहे. यात एमबीए ग्रॅज्युएट मोहित तलरेजा यांनी शहरांमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना एक सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, अमर्याद पगाराच्या मागे धावत राहण्याऐवजी दरमहा दीड लाख ते दोन लाख रुपये कमाईला आपली वैयक्तिक आर्थिक सीमा मानायला हवी. जास्तीत जास्त पगार मिळवण्याच्या या शर्यतीला त्यांनी थेट 'ट्रॅप' म्हणजे सापळा असं म्हटलं आहे.
शहरातल्या प्रोफेशनल्सनी लवकरात लवकर एका ठराविक पगाराच्या पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असं तलरेजा सांगतात. भारतात जर कोणी महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचत असेल, तर हाच त्याचा बेंचमार्क असायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार हा बेंचमार्क स्वतः ठरवू शकतो, हेही त्यांनी नमूद केलं.
यापुढे जाऊन तलरेजा सांगतात की, तुम्ही जितक्या जास्त पगाराच्या मागे धावता आणि जितकं वर जाण्याचा प्रयत्न करता, तितक्याच जास्त गोष्टींचा त्याग तुम्हाला करावा लागतो. याचा थेट परिणाम आयुष्यातल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर होतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात भरपूर कष्ट करून एक आर्थिक सुरक्षेची पातळी गाठावी आणि त्यानंतर करिअरमध्ये पुढे जाण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, असा सल्ला तलरेजा देतात. पण करिअर आणि पगार हेच आयुष्यातलं एकमेव प्राधान्य बनवू नये, यावर त्यांनी भर दिला.
आरोग्य, कुटुंब आणि नवनवीन गोष्टी शिकणं या बाबींकडे दुर्लक्ष होऊ नये, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधलं. जेव्हा माणूस यश किंवा प्रगतीचा एकमेव निकष म्हणून फक्त पगार आणि कामाकडे बघतो, तेव्हा या महत्त्वाच्या गोष्टी हळूहळू मागे पडत जातात, असं ते सांगतात.
स्वतःचा वेळ विकून सतत पैसे कमावणं, जास्त पगाराच्या मागे धावत राहणं किंवा रात्रंदिवस मेहनत करून दुसऱ्याच कोणाला तरी श्रीमंत बनवणं, या मार्गाने दीर्घकालीन समाधान मिळेलच असं नाही. त्याऐवजी त्या वेळेचा काही भाग स्वतः नवीन काहीतरी शिकण्यासाठी किंवा उत्पन्नाचा दुसरा मार्ग तयार करण्यासाठी वापरायला हवा, असा सल्ला तलरेजा यांनी दिला आहे.