गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:46 IST

'मैत्रेया' सिनेमातलं 'तुझे नाव घेता' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, क्रांती रेडकर-उर्मिला कानेटकरचं नृत्य खास

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगामी 'मैत्रेया' सिनेमातलं भक्तीगीत रिलीज, गाण्यात क्रांती रेडकर वानखेडे आणि उर्मिला कानेटकर अनेक वर्षांनी एकत्र नाचताना दिसणार.

'मैत्रेया' सिनेमातलं 'तुझे नाव घेता' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, क्रांती रेडकर-उर्मिला कानेटकरचं नृत्य खास छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणपती बाप्पाच्या आगमनाला आता मोजकेच दिवस उरले आहेत आणि त्यामुळे सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग आणि भक्तीचं वातावरण दिसायला लागलं आहे. या उत्साहात आणखी भर घालणारं एक गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आलं आहे, ते म्हणजे आगामी 'मैत्रेया' या मराठी सिनेमातलं 'तुझे नाव घेता' हे गणपती गीत. ढोल-ताशांचा जल्लोष, भक्तीभाव आणि जोरदार नृत्य यामुळे हे गाणं सध्या चर्चेत आहे.

हे गाणं सिनेमातल्या समर, आयुषी, स्काय आणि रूची या पात्रांवर चित्रित करण्यात आलं आहे. गणेशोत्सवाचा जल्लोष, कलाकारांचा उत्साह आणि दमदार बीट्स यामुळे गाण्याला खास फेस्टिव्हल टच मिळाला आहे. पण गाण्यातलं खरं सरप्राईज वेगळंच आहे. सिनेमाच्या दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर या दोघी या गाण्यात खास नृत्य करताना दिसणार आहेत. बऱ्याच काळानंतर या दोघी एकत्र नाचताना दिसणार असल्यामुळे गाण्याची मजा आणखी वाढली आहे.

'तुझे नाव घेता' या गाण्याचे शब्द गुरू ठाकूर यांनी लिहिले असून संगीत पंकज पडघन यांनी दिलं आहे. गाणं गायलंय शिवम सिंग आणि अपूर्वा निषाद यांनी, आणि दोघांच्या दमदार आवाजामुळे गाण्याला वेगळीच रंगत आली आहे. भक्तीचा भाव आणि सणाचा उत्साह यांचा छान मेळ या गाण्यात साधलेला दिसतो.

गाण्याबद्दल बोलताना क्रांती रेडकर वानखेडे म्हणाल्या, "गणपती बाप्पा आणि मराठी माणसाचं नातं खूप खास आहे. त्यामुळे 'तुझे नाव घेता' हे गाणं करताना त्यात भक्ती तर असावीच, पण त्याचबरोबर गणपतीच्या उत्सवाचा आनंद, उत्साह आणि जल्लोषही दिसावा, अशी आमची इच्छा होती." त्या पुढे म्हणाल्या, "पंकज पडघन यांचं संगीत, गुरू ठाकूर यांचे शब्द आणि शिवम सिंग व अपूर्वा निषाद यांचे आवाज यामुळे गाणं खूप छान जमून आलं आहे. उर्मिला आणि मी बऱ्याच काळानंतर एकत्र नाचताना दिसणार आहोत, हा माझ्यासाठीही खूप खास अनुभव आहे."

संगीतकार पंकज पडघन यांच्या मते, गाण्यातून गणपती बाप्पाच्या भक्तीचा भाव आणि सणाचा जल्लोष दोन्ही गोष्टी जाणवाव्यात यासाठी परंपरा आणि आजच्या पिढीला आवडेल असा उत्साही साउंड एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर यांच्या नृत्याची झलक हे गाण्याचं आणखी एक खास आकर्षण ठरणार असून, गणेशोत्सवाच्या काळात हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.

समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित 'मैत्रेया' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर सिनेमाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. सिनेमात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'तुझे नाव घेता' या गाण्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, 'मैत्रेया' हा सिनेमा येत्या २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ