IND vs PAK Hockey: कमाल! हॉकीच्या मैदानात भारताच्या मुलींनी पाकिस्तानला धुतलं, पाकिस्तानची लाजिरवाणी कामगिरी
महिला ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला १९-० असं एकतर्फी हरवत नवा विक्रम रचला.
भारत आणि पाकिस्तान म्हटलं की मैदान कुठलंही असो, लढत जोरदार होणारच अशी अपेक्षा असते. क्रिकेट असो वा दुसरा कुठला खेळ, पाकिस्तानला धूळ चारायला भारतीय खेळाडू नेहमीच तयार असतात. यावेळी मात्र महिला ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला इतकं एकतर्फी हरवलं की पाकिस्तानच्या संघाची अगदी फजिती झाली.
चीनमधील मोकी शहरात ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ समोरासमोर आले होते आणि भारताने हा सामना तब्बल १९-० असा जिंकला. या महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाचा हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय ठरलाय. या दणदणीत विजयामुळे भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून तिथे संघाची गाठ दक्षिण कोरिया किंवा मलेशियाशी पडणार आहे.
सामन्याच्या सातव्या मिनिटालाच भारताने गोलचा नारळ फोडला. पूजा साहूने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये एकूण पाच गोल झाले, तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने फक्त एकच गोल नोंदवला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने थोडा जोर लावून चांगला खेळ करून पाहिला, पण तरीही भारताने या क्वार्टरमध्ये तीन गोल ठोकले. शेवटच्या म्हणजे चौथ्या क्वार्टरमध्ये तर भारताने सगळ्यात जास्त म्हणजे सहा गोल केले. असं करत भारताने संपूर्ण सामन्यात एकूण १९ गोलांचा डोंगर रचला.
या सामन्यात भारताच्या तब्बल १३ खेळाडूंनी गोल नोंदवले. पूजा मलिकने २७व्या, ४९व्या आणि ५१व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. रोशनी, सानिका चंद्रकांत माने, मधु सिदार आणि सुप्रिया या चौघींनी प्रत्येकी दोन-दोन गोल केले. याशिवाय पूजा साहू सोबतच तनुश्री दिनेश कडू, सुखवीर कौर, गीता यादव, तनुजा टोप्पो, पूर्णिमा यादव, कृष्णा शर्मा आणि बिनिमा धन या खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
महिला ज्युनियर हॉकी आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारत गतविजेता संघ आहे आणि या स्पर्धेत आतापर्यंत भारताने एकही सामना गमावलेला नाही. एलिट पूल फेरीत भारताचा चीनसोबतचा सामना गोलरहित बरोबरीत सुटला होता, तर जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया या संघांविरुद्ध भारताने एकतर्फी विजय मिळवले होते. महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धेला १९९२ साली सुरुवात झाली आणि त्यानंतर २०१५ पर्यंत चीन आणि दक्षिण कोरिया या दोनच संघांचा दबदबा या स्पर्धेत होता. मात्र गेल्या दोन स्पर्धांमध्ये भारताने दक्षिण कोरिया आणि चीनला हरवत विजेतेपद स्वतःच्या नावावर केलं होतं.