महिला आशिया कप उपांत्य फेरी: भारत-बांगलादेश १० सप्टेंबरला दुबईत आमनेसामने
गट फेरीतील सर्व सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली असून, आता त्यांची गाठ बांगलादेशशी पडणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महिला आशिया कप स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून उपांत्य फेरीत कोण कोण पोहोचणार हे आता स्पष्ट झाले आहे. गट फेरीतील आपले सगळे सामने जिंकत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये एन्ट्री पक्की केली. गट 'अ' मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पुढच्या फेरीत पोहोचले, तर गट 'ब' मधून गतविजेता श्रीलंका आणि बांगलादेश यांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ बांगलादेश महिला संघाशी पडणार आहे.
दोन्ही संघांमधल्या आतापर्यंतच्या लढतींचा विचार केला तर भारताचं पारडं जड आहे. बांगलादेशविरुद्ध भारतीय महिला संघाने आतापर्यंत एकूण २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी २१ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर फक्त ३ सामने भारताला गमवावे लागले आहेत. बांगलादेशकडून भारताला शेवटचा पराभव २०२३ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पत्करावा लागला होता. त्यानंतर दोन्ही संघांत जे ८ सामने झाले, ते सगळेच्या सगळे भारताने जिंकले आहेत.
आशिया कप स्पर्धेपुरता विचार केला तर टी-२० आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ५ सामने झाले आहेत, त्यातले ३ भारताने तर २ बांगलादेशने जिंकले आहेत. २०२४ सालच्या मागच्या महिला टी-२० आशिया कपमध्येही या दोन्ही संघांची गाठ उपांत्य फेरीत पडली होती आणि तेव्हा भारताने १० विकेटनी एकतर्फी विजय मिळवला होता.
बांगलादेशने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं ते युएईला हरवून. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने आधी बॅटिंग करत २० षटकांत ७ विकेट गमावून १०३ धावा केल्या. युएईसमोर १०४ धावांचं लक्ष्य ठेवलं, पण युएईची बॅटिंग पूर्ण कोलमडली आणि त्यांना २० षटकांत ९ विकेट गमावून फक्त ६९ धावाच करता आल्या. गट 'ब'च्या गुणतालिकेत बांगलादेश आणि युएई हे दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते, आणि हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत जाणार होता. या विजयासोबतच बांगलादेशने भारताविरुद्धच्या सेमीफायनलमधलं आपलं स्थान पक्कं केलं.
भारत आणि बांगलादेश यांच्यातला हा उपांत्य फेरीचा सामना १० सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना रात्री ८ वाजता सुरू होईल, त्याआधी सायंकाळी ७:३० वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर येतील. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर थेट पाहता येईल, तर ऑनलाइन पाहण्यासाठी सोनी लिव्ह ॲप किंवा वेबसाइट वापरता येईल.