राज्य सरकारची मोठी घोषणा; मच्छीमारांना मिळणार 20-22 हजारांचं आर्थिक अनुदान
मासेमारी बंद असलेल्या काळात मच्छीमारांना थेट आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारकडून वेगवेगळ्या घटकांसाठी सध्या निर्णय आणि घोषणा सातत्याने होत आहेत, त्यातच आता मच्छीमारांसाठीही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
माशांच्या प्रजनन काळात काही महिने मासेमारीवर बंदी घातली जाते. या बंदीच्या कालावधीत मासेमारी करता येत नसल्यामुळे मच्छीमारांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात बुडतं आणि त्यांच्या कुटुंबांवर याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे या काळात मच्छीमार कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा यासाठी उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याचं राणे यांनी नमूद केलं.
पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. आंध्र प्रदेश राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांना साधारण 20 ते 22 हजार रुपयांचं आर्थिक अनुदान देण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही राणे म्हणाले.
दुष्काळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती, त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काम केलं हे जनतेने पाहिलेलं आहे, असा टोला राणे यांनी लगावला. उद्धव ठाकरे "तुमसे ना हो पायेगा" अशी टीका करतात, पण त्याच वाक्याचे ब्रँड अॅम्बेसेडर खुद्द उद्धव ठाकरेच आहेत, अशी खोचक टीका राणे यांनी केली.
राज्यातील काही भागांत यंदा पावसाचं प्रमाण कमी राहिल्यामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याचंही राणे यांनी मान्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका आधीच स्पष्ट केली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगितलं आहे. शेतकऱ्यांसाठी 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली.
दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीबद्दल विचारले असता नितेश राणे यांनी सध्या त्यावर भाष्य करणं टाळलं. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून सुरू असून प्रकरण न्यायालयातही प्रलंबित आहे, त्यामुळे चौकशीला अडथळा येईल असं कोणतंही वक्तव्य करू नये, अशी भूमिका राणे यांनी मांडली. मात्र संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे हे या प्रकरणावर सातत्याने बोलत असल्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात, असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं.